कोल्हापूर येथे दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेला उत्साही वातावरणात प्रारंभ !
सनातन निर्मित ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन !
नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर), २६ मार्च (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ (पू. आठवले यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया, त्यांचे सन्मान सोहळे आणि त्यांच्या विषयीच्या अनुभूती) या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते २६ मार्च या दिवशी करण्यात आले. हा ग्रंथ परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी संकलित केला आहे. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे बांधकाम व्यावसायिक आणि सनातनचे साधक श्री. आनंद पाटील उपस्थित होते. सनातन संस्थेच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थिती होती. येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेत कोल्हापूर, सांगली, सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत. शंखनादानंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यशाळेत धर्मप्रेमींना साधना, हिंदु राष्ट्र, आदर्श वक्ता कसे व्हावे ? यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन मिळेल.
पू. भाऊकाकांचे ‘गीतादर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे तत्त्वज्ञानावरील ग्रंथ अप्रतिम ! – मनोज खाडये
पू. भाऊकाकांनी ‘गीतादर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे तत्त्वज्ञानावरील अप्रतिम ग्रंथ लिहिले आहेत. ते ज्ञानयोगानुसार साधना करतांना २७ जून २०१९ या दिवशी सनातनच्या १०१ व्या संतपदी विराजमान झाले. ते वयाच्या ८६ व्या वर्षीही विविध शब्दकोश आणि संदर्भग्रंथ यांचा अभ्यास करून भाषांतर परिपूर्ण करत आहेत.
ग्रंथांच्या माध्यमातील अमूल्य ज्ञानाचा सर्वांनी लाभ करून घ्यावा ! – आनंद पाटील, सनातन संस्था
ग्रंथांच्या माध्यमातून दिलेले ज्ञान अमूल्य आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ करून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात इतक्या मोठ्या प्रमाणात गड-दुर्ग बांधले. हे गड-दुर्ग स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहेत. मी व्यवसाय करतांना राष्ट्र आणि धर्म हित जाणून केला.
हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा पहिला दिवस !
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ६० हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार !
कोल्हापूर – दुपारच्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली. या गटचर्चेत कोल्हापूर जिल्ह्यात २७ ठिकाणी, सांगली जिल्ह्यात १४ तर सातारा जिल्ह्यात १९ अशा एकूण ६० हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केली. या सभा ठरवण्यात धर्मप्रेमींचा पुढाकार होता.
पहिल्या दिवशीच्या अन्य सत्रातील विषय
१. ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर सौ. विजया वेसणेकर आणि आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन झाल्यावर नामजपाच्या कालावधीत अनेकांना ‘मनात अन्य कोणतेही विचार आले नाहीत, एकाग्रतेने नामजप होत आहे’, यांसह अन्य अनुभूती आल्याचे सांगितले. अनेकांनी ते नियमित नामजप करत असून यापुढील काळात ते चालू ठेवू, असेही सांगितले.
काही धर्मप्रेमींना नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती
अ. सौ. वैशाली माने, हुपरी, कोल्हापूर – आपण सत्यनारायणाची पूजा करत आहोत आणि नामजप करत आहोत. नामजप करतांना ‘श्रीकृष्णाच्या चरणी फुले वहात आहे’, असे वाटत होते. लख्ख प्रकाश दिसला.
आ. सौ. वंदना कोळी, हालोंडी, कोल्हापूर – नामजप करतांना प्रकाश दिसला.
इ. श्री. अक्षय बिसुरे, सातारा – ‘भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी बसून नामजप करत आहे’, असे जाणवले.
२. दुपारच्या सत्रात प्रायोगिक भाग घेण्यात आला. यात ‘आदर्श संपर्क कसा करावा ?’, ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेची अनुमती पोलीस ठाण्यात कशा प्रकारे घ्यावी ?’ याचा प्रायोगिक भाग दाखवण्यात आला.
३. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी आणि श्री. मनोज खाडये यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व विषद केले. या वेळी धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे नियकालिक आहे. या दैनिकाच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म, परंपरा, सण, उत्सव या संदर्भातील विविध ज्ञान देणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय.’
४. सायंकाळच्या सत्रात सौ. साधना गोडसे, आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे आणि सौ. विजया वेसणेकर यांनी ‘नामजपाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
६. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया या विषयावर ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. सम्राट देशपांडे आणि आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.
विशेष
१. गटचर्चा झाल्यावर धर्मप्रेमी श्री. सचिन चव्हाण यांनी अशा कार्यशाळा वर्षातून २ वेळा घेतल्या जाव्यात, असे मत व्यक्त केले.
२. कार्यशाळेच्या आदल्या दिवशी निवासाच्या ठिकाणी बर्याच धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन एकमेकांशी ओळख करून घेतली आणि मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधला. यातून कुटुंबभावना दिसून आली. काही धर्मप्रेमींनी एकत्र येऊन सामूहिक नामजप केला, तर एका धर्मप्रेमीने वैयक्तिक वेळेचा सदुपयोग करून ग्रंथवाचन केले.