गोव्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायद्यानुसार ११ पटींनी अधिक दंड
पणजी, २६ मार्च (वार्ता.) – सुधारित नवीन मोटर वाहन कायद्याची गोव्यात १ एप्रिलपासून कार्यवाही करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. नवीन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यास पूर्वीच्या तुलनेत ६ ते ११ पटींनी अधिक दंड ठोठावला जाणार आहे. सुधारित मोटर वाहन कायदा २७ जुलै २०२१ या दिवशी अधिसूचित करण्यात आला होता. त्याची कार्यवाही १ एप्रिल २०२२ पासून करण्यात येणार आहे.
१. नवीन नियमांनुसार शिरस्राण न घालता दुचाकी चालवणे किंवा दुचाकीवरून तिघे जण जात असल्यास १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे आणि वाहनचालक अनुज्ञप्ती ३ मासांसाठी रहित केली जाणार आहे.
२. वाहनचालक अनुज्ञप्तीविना वाहन चालवल्यास आणि ‘परमिट’विना व्यावसायिक वाहन चालवल्यास १० सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे.
३. विभागीय वाहतूक कार्यालयात (आर्.टी.ओ.) नोंदणी न करता किंवा वाहनाचा विमा न उतरवता वाहन चालवल्यास २ सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
४. धोकादायक पद्धतीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे, नियमाचे उल्लंघन करून वेगाने गाडी चालवणे, चारचाकी वाहन चालवतांना ‘सीट बेल्ट’ न घालणे या सर्रासपणे होणार्या गुन्ह्यांसाठी आता १ सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे.
नवीन मोटर वाहन कायद्याच्या कार्यवाहीला माझा विरोध ! – मायकल लोबो, काँग्रेस
यापूर्वी मी मंत्रीमंडळात असतांनाही नवीन मोटर वाहन कायद्याच्या कार्यवाहीला विरोध केला होता. शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार आहेत. या वेळी प्रेक्षकांमधील काही लोकांनी ‘सर्वसामान्य नागरिकांवरील बोजा वाढलेला आहे आणि तो समाधानी नाही’, हे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे.