नगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !
नगर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढूबुद्रुक येथून समाधी स्थळापासून प्रज्वलित करून आणलेल्या ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन नगर शहरात झाले आहे. या धर्मवीर ज्वालेमधून प्रज्वलित करून जिल्हाभर धर्मवीर ज्वाला नेण्याचे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नगर जिल्हा प्रमुख बापू ठाणगे, विनोदभैय्या काशिद, आशिष क्षीरसागर, नगर दक्षिण जिल्हा सहप्रमुख संतोष टेकाळे आणि नगर उत्तर जिल्हा सहप्रमुख प्रवीण पैठणकर यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. पुण्यतिथी कार्यक्रमासाठी तालुक्यामधील सर्व धारकरी बांधवांनी नगर शहरातील सबजेल चौकात असलेल्या आई तुळजाभवानी मंदिरात ठेवलेल्या ‘धर्मवीर ज्वाले’स प्रज्वलित करून आपापल्या तालुक्यांमध्ये ‘धर्मवीर ज्वाला’ न्यावी, तसेच नगर जिल्ह्यातील ज्या मंडळांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. त्या सर्व मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून १ एप्रिल या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करावी. मूकपदयात्रा काढून संभाजी महाराजांच्या धर्मनिष्ठतेचे स्मरण करत त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.