मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !
‘भगवद्गीता’ हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असून, हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवणारा तो मानबिंदू आहे. पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनीही भगवद्गीतेची थोरवी गायली आहे. बर्याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही. यासंदर्भात पुढील सूत्रे उपयुक्त ठरतील.
१. मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यातील मर्यादा !
अ. कोणताही विषय शिकवतांना शिकणार्याची क्षमता आहे कि नाही, हे बघून ते शिकवतात. गीता मोठ्या माणसांनाही कळत नाही, तर मुलांना काय कळणार ? ‘मुलांना गीता शिकवणे’, हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण शिकवण्याहून कठीण आहे ! एखाद्याची मूळची ज्ञानमार्गी प्रकृती असेल, तर त्याला लहान वयात गीता शिकणे जमू शकते; पण असे फार थोडे जण असतात.
आ. गीता मूळ संस्कृतमधली शिकवली, तर मुलांना ती कधीच कळणार नाही.
इ. मुलांना गीतेतील शिकवण आकलन न झाल्याने गीता शिकण्याचा कंटाळा येईल. त्यामुळे मुलांमध्ये गीता, तसेच हिंदूंचे अन्य धर्मग्रंथ यांच्याविषयी नकारात्मकता आणि उदासीनता निर्माण होऊ शकते.
ई. गीता नुसती पाठ केली, तर तिचा काही उपयोग नाही. तिच्यातील विचार समजून ते कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.
उ. आपली भारतभूमी ही संतांची मांदियाळी आहे. या संतांपैकी आजपर्यंत किती संतांनी समाजाला गीता शिकवली आहे किंवा शिकवत आहेत ?
२. मुलांना प्रामुख्याने साधना शिकवण्याचे महत्त्व !
अ. मुलांना गीतेतील तात्त्विक माहिती शिकवण्यापेक्षा प्रामुख्याने हिंदु धर्मात सांगितलेली साधना शिकवणे आणि ती त्यांच्याकडून करवून घेणे महत्त्वाचे आहे. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन कृतीच्या स्तरावर करायचे प्रयत्न, उदा. नामजप, सत्सेवा.
आ. मुलांना साधना शिकवली आणि ती त्यांच्याकडून करवून घेतली, तरच ते खर्या अर्थाने ‘हिंदू’ बनू शकतील ! ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ आहे – ‘हीनान् गुणान् दूषयति इति हिंदुः ।’ म्हणजे ‘कनिष्ठ, हीन, अशा रज आणि तम गुणांचा नाश करणारा तो ‘हिंदु’.
इ. व्यक्तीने (मुले, तरुण इत्यादींनी) साधना केल्यामुळे तिची सात्त्विकता वाढली की, तिचे मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध होऊ लागतात. यामुळे व्यक्तीमध्ये आपोआपच सदाचार, नैतिकता, परस्परांविषयी प्रेमभाव, धर्माभिमान, राष्ट्रप्रेम, धर्मबंधुत्व इत्यादी गुण निर्माण होऊ लागतात. राष्ट्रातील सर्वांमध्येच असे गुण निर्माण होऊ लागले की, मग त्या राष्ट्राची वाटचाल आदर्श अशा रामराज्याच्या दिशेने होऊ लागते.
ई. गीतेतील उच्च आध्यात्मिक तत्त्वज्ञान समजण्यासाठी व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असायला लागते. सध्याच्या कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची सरासरी आध्यात्मिक पातळी जेमतेम २० टक्के इतकीच असल्याने त्यांना गीता समजत नाही. व्यक्तीने साधना केल्यावर तिची आध्यात्मिक पातळी वाढते, तसेच उच्च आध्यात्मिक तत्त्वज्ञान समजण्यासाठी आवश्यक असणारी विवेकशीलता आणि बुद्धीची प्रगल्भताही तिच्यात निर्माण होते. थोडक्यात गीता समजण्यासाठी आवश्यक असणारा आध्यात्मिक पाया निर्माण होतो. यानंतर व्यक्तीला गीता कळू शकते.
उ. मुलांना साधना शिकवण्याच्या जोडीलाच गीतेच्या ऐवजी संतांची सोपी भजने, अभंग इत्यादी शिकवून त्यांच्या संदर्भातील गीतेचा श्लोक सांगितल्यास मुलांना विषयही शिकता येईल आणि त्यांना गीतेचे महत्त्वही कळेल.
(‘काळानुसार कोणती साधना करणे अधिक योग्य आहे’, याविषयीचे मार्गदर्शन ‘सनातन संस्था’ आणि सनातनचे ग्रंथ करतात.)
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२४.३.२०२२)