शाळांमधून भगवद्गीता शिकवण्यास शासनाने अनुमती द्यावी ! – राम कदम, आमदार, भाजप
|
मुंबई,२६ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील शाळांमधून श्रीमद्भगवद्गीता शिकवली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने ती शिकवण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली; मात्र ही मागणी सरकारने फेटाळून लावली. या वेळी सभागृहात कदम यांनी भगवद्गीतेचे २ ग्रंथ सर्व सदस्यांना दाखवत ते ग्रंथ विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केले. राम कदम हे भगवद्गीतेचे सूत्र मांडत असतांना त्यांना सत्ताधारी पक्षातील एकाही आमदाराने पाठिंबा दिला नाही.
सरकारच्या वतीने शिक्षण म्त्रांयनी भगवत गीतेला शाळे मधे शिकवण्यासाठी नकार दिला आहे, विरोध केला आहे !
सरकार व शिक्षण म्त्रांयनी एकदा ही भगवत गीता वाचा व हा धार्मिक ग्रंथ आहे अशा पाहण्या पेक्षा हा एक यूनिवर्सल ग्रंथ आहे ह्या दृष्टिकोणातुन यांच्या कड़े पाहण्याची आवश्यकता आहे। pic.twitter.com/tKL8dlt81j
— Ram Kadam (@ramkadam) March 25, 2022
आमदार राम कदम पुढे म्हणाले, ‘‘सरकारच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भगवद्गीता शाळेत शिकवण्यास विरोध दर्शवला आहे. माझी सरकारला विनंती आहे की, मी ही भगवद्गीता आपल्याला भेट म्हणून देतो. ती गीता आपण शिक्षणमंत्री आणि सरकार यांना द्यावी. ‘हा धार्मिक ग्रंथ आहे’, असे पहाण्यापेक्षा हा एक ‘युनिव्हर्सल’ (सार्वत्रिक) ग्रंथ आहे, असे समजून याकडे पहाण्याची आवश्यकता आहे. देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ? देशातील इतर राज्यांत गीता शिकवली जाते; मात्र महाराष्ट्रात तिला विरोध केला जातो. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. इतर २ पक्ष (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) जरी भगवद्गीतेला संमती देत नसतील, तर शिवसेनेने पुढे येऊन गीतेचे समर्थन करून शाळांमधून गीता शिकवण्यास अनुमती दिली पाहिजे.’’