भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांविषयी सरकारकडून समाधानकारक उत्तरे नाहीत ! – देवेंद्र फडणवीस
दाऊदशी व्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचे सरकारने समर्थन केले !
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही. सरकार त्यांचे संरक्षण करत आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कुख्यात आतंकवादी दाऊदशी व्यवहार करणारे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे समर्थन केले आहे. विधानसभा आणि विधान परिषद येथे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे मांडल्यानंतर एकाही प्रकरणाविषयी सरकारने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला. विधानभवनातील मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि विधान परिषद येथे आम्ही महिला अत्याचार, शेतकर्यांच्या आत्महत्या, शक्ती कायदा, वाढती गुन्हेगारी, एस्.टी. महामंडळाचा प्रश्न, नवाब मलिकांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र असे अनेक विषय लावून धरले; मात्र सरकारला या प्रश्नांवर उत्तरे देता आली नाहीत. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना एका प्रकरणात अडकवल्याप्रकरणी आम्ही पेनड्राईव्हद्वारे पुरावे दिले आहेत; मात्र ‘या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (‘सीआयडी’)च्या वतीने निष्पक्ष चौकशी होईल’, असे आम्हाला वाटत नाही. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी होण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत.
शेतकर्यांच्या पंपांची वीजजोडणी तोडण्याला स्थगिती देण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. हे यापूर्वीच झाले असते, तर सूरज जाधव शेतकर्याने आत्महत्या केली नसती. भाजपचे नेते बोलल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून नोटीस पाठवून कारवाई करण्यात येत आहे. आमच्यावर कितीही कारवाई झाली, आम्हाला कारागृहात पाठवले, तरी आम्ही बोलायचे थांबणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही प्रश्नी दिलासा मिळाला नाही. सरकारने एस्.टी. संपाविषयी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे हा संप अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वर्ष २०१७ पासून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची लढाई चालूच आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.