‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एकेक वाक्य ही आध्यात्मिक संपत्ती आहे’, असा भाव असणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !
‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला काही मासांपूर्वी त्यांचा सत्संग ऐकायला मिळाला. या सत्संगात त्यांनी चैतन्यमय वाणीतून केलेल्या मार्गदर्शनातून, तसेच संत आणि अन्य साधक यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘मी गेली २०-२५ वर्षे साधकांना मार्गदर्शन करत आहे. माझ्या मार्गदर्शनातील सूत्रे अनेक साधक लिहून घेतात; पण मार्गदर्शनातील सूत्रे कु. श्रियाप्रमाणे सात्त्विक शब्दांत आजवर कुणी लिहून दिली नाहीत. अशा लिखाणाचे हे पहिलेच उदाहरण आहे ! कु. श्रिया एक सर्वार्थांनी आदर्श ‘साधिका’ आहे, हे तिचे बोलणे, चालणे, वागणे अशा प्रत्येक कृतीतून लक्षात येते. साधकांच्या पुढच्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन कोण करील, याची श्रियामुळे मला निश्चिती झाली आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.३.२०२२)
१. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या चैतन्यमय वाणीतून केलेल्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. आपल्यात भाव असेल, तरच गुरु आपल्यावर कृपा करतात.
आ. ‘आपल्यावर आपल्या गुरूंची कृपा कशी होईल ? त्यांचा आशीर्वाद कसा मिळेल ?’, यासाठी आपले प्रयत्न झाले नाहीत, तर आपल्याला अपराधी वाटले पाहिजे. ज्या साधकात अपराधीभाव निर्माण होत नाही, त्याची कधीच प्रगती होत नाही.
इ. नेहमी परिस्थिती स्वीकारावी. कठीण परिस्थितीत देवच साहाय्याला येतो.
ई. साधना करत आहात, तर साधनेचाच विचार करा. साधकांना ‘मला माया नको, तर साधना, भाव आणि ईश्वर इतकेच पाहिजे’, असे वाटले पाहिजे.
उ. शिकण्यात आनंद आहे. शिकवण्यात आनंद नाही.
ऊ. स्वेच्छेने सेवा भावपूर्ण होत नाही. ईश्वरच्छेने सेवा केली, तरच ती भावपूर्ण होते.
ए. भाव आणि भक्ती असेल, तर कुठेही ‘रामनाथी आश्रम’ निर्माण करता येतो.
ऐ. नामजप भावपूर्ण होणे महत्त्वाचे आहे. नामजप केल्याविना झोपू नये.
ओ. ईश्वराशी एकरूप होईपर्यंत ‘मी लहान आहे’, हाच विचार असला पाहिजे. ‘आपण मोठे आहोत’, असा विचार आला, तर आपला अहं वाढू लागतो.
औ. एकमेकांशी बोलतांना ‘नुसते बोलणे’, हे मानसिक स्तरावरचे आहे. आपण नेहमी आध्यात्मिक स्तरावरच बोलावे.
अं. ‘आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आतून (ईश्वराकडून) येणे’, हा साधनेचा पुढचा टप्पा आहे.
क. सत्संगात परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून सूक्ष्मातील प्रयोग करवून घेतात. त्यातून साधकांच्या साधनेची स्थिती त्यांच्या लक्षात येते.
ख. परात्पर गुरु डॉक्टर सत्संगातून ‘सूक्ष्म-परीक्षण, सूक्ष्मातील अभ्यास, अनुभूतींचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकवतात. त्यामुळे ‘चांगली आणि वाईट स्पंदने कशी असतात ?’, हे शिकायला मिळते. ‘त्या प्रत्येक गोष्टीमागे काय कारण आहे ? पंचतत्त्वे कशी कार्य करतात ? आपल्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे आपल्याला पंचतत्त्वांच्या अनुभूती कशा येतात ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले.
‘ही सर्व सूत्रे आपल्याला एका वाक्यांची दिसत असली, तरी ते परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेले अमूल्य ज्ञान आहे. या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी आपला संपूर्ण जन्मही अल्प पडेल. हे परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेले आध्यात्मिक ज्ञान आणि संपत्ती आहे. ती कधीच संपणार नाही आणि अन्यत्र कुठे मिळणार नाही’, असे मला वाटते.
२. संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. संत केवळ साधकांचे स्वभावदोष न पहाता गुणही पहातात आणि त्यानुसार त्या साधकाला साधनेसाठी प्रेरित करतात.
आ. एका सत्संगात सद्गुरु राजेंद्र शिंदे उपस्थित होते. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांना पाहून आणि त्यांच्याशी बोलतांना भाव जागृत झाला. त्या वेळी ‘आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्यासमोर आपले गुरु आल्यावर आपल्या मनात श्री गुरूंप्रती उत्कट भाव हवा. त्यांच्यासमोर आपले आचरण सर्वसामान्य साधकाप्रमाणे नम्रतेचे असायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.
इ. सत्संगात पू. तनुजा ठाकूर उपस्थित असत. त्यांच्याकडून मला ‘प्रत्येक प्रसंगात सकारात्मक असण्याचे महत्त्व, गुरूंच्या प्रती आपल्या मनात कसा भाव असला पाहिजे ? गुरूंचे आज्ञापालन तंतोतंत कसे केले पाहिजे ?’, अशी साधनेतील पुष्कळ महत्त्वपूर्ण सूत्रे शिकायला मिळाली.
३. साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
सत्संगात साधकांनी त्यांच्या साधनेतील अडचणींविषयी विचारले. साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्यातून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. साधक परात्पर गुरु डॉक्टरांना अनुभूती सांगतात. त्या वेळी साधकांमधील परात्पर गुरुदेवांप्रती असलेला आर्तभाव मला अनुभवायला आणि शिकायला मिळाला.
आ. साधकांना परात्पर गुरुदेवांना भेटण्याची जितकी तळमळ असते, त्याहून अधिक ओढ परात्पर गुरुदेवांना सर्व साधकांना भेटण्याची असते.
४. दैवी बालकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
‘आनंदी रहाणे, साधनेचे प्रयत्न करणे, शिकण्याची वृत्ती, पुढाकार घेऊन सेवा करणे, देवाच्या अनुसंधानात रहाणे, गुरूंप्रती भाव, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता’, असे अनेक गुण मला सर्वच दैवी बालकांकडून शिकायला मिळत आहेत.
५. स्वतःमध्ये जाणवलेले पालट
अ. पूर्वी माझा दिवसभरातील काही वेळ वाया जायचा; पण आता भगवंताने मला त्याच्या सत्संगात व्यस्त ठेवल्यामुळे वेळ वाया घालवण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही.
आ. पूर्वी मला काही वेळा कंटाळा आल्यावर मी खेळायचे; परंतु आता मला कंटाळा येतच नाही आणि खेळावेसेही वाटत नाही. माझ्या मनात सतत ‘भगवंत आणि सत्संग’ यांविषयी विचार असतात.
इ. मी सतत आनंदी असते. माझ्या आनंदात पुष्कळ वाढ झाली आहे. पुष्कळ वेळा काही कारण नसतांनाही मला आतून आनंदाच्या उकळ्या फुटल्यासारखे होत असते.
ई. मी खेळत असतांना, सत्संगात आणि एखाद्या व्यक्तीशी बोलतांना किंवा अन्य वेळीही माझा नामजप चालू असतो.
उ. कधी माझे काही चुकत असले, मी जरा जरी चिडचिड केली किंवा वेळ वाया घालवत असेन, तर सूक्ष्मातून देव माझ्या कानात सांगतो, ‘श्रिया, तुझे चुकत आहे. नामजप कर.’
ऊ. परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत असतात. ते सतत माझ्याशी बोलत असतात. मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून आणि विचारून करते. मला एखादी कृती जमत नसल्यास परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून मला ‘ती कृती योग्य पद्धतीने कशी करायची ?’, ते सांगतात, उदा. दिवाळीत एक दिवस मला रांगोळी काढायची होती; पण मला काहीच सुचत नव्हते. तेव्हा सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला रांगोळी काढायला शिकवली आणि ‘रांगोळीत रंग कोणते भरायचे ?’, तेही सांगितले.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
सत्संगात शिकायला आणि अनुभवायला आलेली सूत्रे शब्दांत सांगणे अशक्यच आहे. ‘सत्संगातील प्रत्येक शब्द थेट अंतर्मनात जातो आणि त्याचा अंतर्मनावर चैतन्यमय संस्कार होतो’, असे मला जाणवते. ‘एक दिवस सत्संग नसेल, तर दिवसभरातील पुष्कळ काही राहून गेले आहे’, असे मला वाटते. सत्संग ऐकायला सूक्ष्मातून देवताही उपस्थित असतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मला या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला देवता, परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांचा कृपाशीर्वाद मिळत आहे. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘त्यांना अपेक्षित असे मला घडता येऊ दे. मला सतत त्यांच्या चरणांशीच रहाता येऊ दे’, हीच त्यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) चरणांवरील,
कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२१)
सत्संगाचा खरा लाभ घेणारी एकमेवाद्वितीय कु. श्रिया राजंदेकर !‘सत्संग चालू झाल्यापासून मला आतून पुष्कळ शांत वाटते. सत्संग झाल्यानंतर मी घरी आल्यावर मला सामान्य स्थितीत येऊन कुटुंबियांशी बोलायला थोडा वेळ लागतो. ‘मी इतका वेळ ध्यानातच होते. मी कोणत्या तरी वेगळ्याच लोकात होते. आता पुष्कळ वेळाने तेथून बाहेर आले आहे’, असे मला वाटते. ‘सत्संगात माझे डोळे उघडे असले, तरी माझे आतून ध्यान लागले आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे मला ‘सत्संग किती वेळ असतो ?’, हे लक्षात येत नाही. त्या वेळी मला तहान किंवा भूक यांचीही जाणीव नसते.’ – कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२१) |