युद्धाचा पहिला अध्याय संपला असून दुसरा चालू झाला आहे ! – रशिया

मॉस्को (रशिया) – युक्रेनवर आक्रमण करण्याचा पहिला अध्याय यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता आम्ही दुसर्‍या अध्यायाच्या दिशेने जात आहोत, असे विधान रशियाचे सैन्याधिकारी सर्गेई रुडस्कॉय यांच्याकडून युद्धाच्या ३१ व्या दिवशी करण्यात आले.

१. सर्गेई पुढे म्हणाले की, या काळात युक्रेनच्या सैन्यशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही आता आमच्या मुख्य लक्ष्याकडे (डोनबास शहरावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याकडे) लक्ष केंद्रित करणार आहोत. लोकांना वाटत आहे की, आम्ही युक्रेनचे तुकडे करत आहोत; मात्र आमचा उद्देश युक्रेनच्या मूलभूत सुविधा नष्ट करण्याचा आहे. यामुळे आम्ही डोनाबासमध्ये अधिक भक्कम हेऊन लढाई लढू शकतो.

२. सर्गेई यांनी माहिती देतांना सांगितले, ‘आतापर्यंत रशियाचे १ सहस्र ३५१ सैनिक ठार झाले आहेत.’ दुसरीकडे नाटो आणि युक्रेन यांनी दावा केला आहे की, रशियाचे १५ सहस्रांहून अधिक सैनिक ठार झाले आहेत.