विधान परिषदेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव एकमताने संमत !
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव हा कर्नाटकचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याचे प्रकरण
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – सोलापूर आणि अक्कलकोट महाराष्ट्राला दिले असल्यामुळे आम्ही बेळगाव घेतला आहे, असे वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटक सरकार यांचा २४ मार्च या दिवशी विधान परिषदेत एकमताने निषेध केला. याविषयीचा ठराव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात मांडला. सभागृहात हा ठराव एकमताने संमत करण्यात आला. ‘महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमाप्रश्नाचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य हे न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे आहे’, असे या वेळी सभापतींनी नमूद केले. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दिवाकर रावते यांनी हा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याविषयी ठराव करण्यात आला.