दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कार्यालयात घुसून दोघांकडून व्यवस्थापकांना धक्काबुक्की !

जो हिंदूंवरील अत्याचारांचे सत्य सांगतो, त्यालाच विरोधाला सामोरे जावे लागते. ‘सत्याचे तोंड दाबण्याचा अश्लाघ्य प्रकार’, असेच याला म्हणावे लागेल !

श्री. विवेक अग्निहोत्री

मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून मला अनेक धमक्या मिळाल्या. माझ्या कार्यालयात २ मुले बळजोरीने घुसली. त्यांनी व्यवस्थापकांसमवेत धक्काबुक्की केली. तेथील महिला कर्मचार्‍यांसमवेत गैरवर्तन केले, त्यांना ढकलून दिले. तेव्हा मी तेथे नव्हतो. त्या दोघांनी माझ्याविषयी विचारले आणि नंतर तेथून पळ काढला, अशी माहिती दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिली. एका मुलाखतीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.

एका ‘न्यूज पोर्टल’ला (वृत्त संकेतस्थळाला) विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हटले की, कॅनडामध्ये प्रथम या चित्रपटाचा एकच ‘शो’ (खेळ) दाखवला जात होता; परंतु नंतर हा चित्रपट कॅनडामध्ये सर्वत्र प्रसारित झाला. भारतामध्ये मात्र हा चित्रपट वादाचा विषय ठरला आहे. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून या चित्रपटावर काम करत होतो. त्यासाठी आम्ही आमचे घरही गहाण ठेवले होते. चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यात गेलो. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक निर्मात्यांना वाटत होते की, आम्ही नेहमीच्या पठडीतील चित्रपट सिद्ध करावा; परंतु आम्हाला तसे करायचे नव्हते. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीसाठी आम्हीच पुढाकार घेतला आणि पैसा उभा करत तो पूर्ण केला.’’