राज्यपालांचा विधानसभेत एवढा अवमान क्वचित्च झाला असेल ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘अंतिम आठवडा प्रस्तावा’वर भाषण

उद्धव ठाकरे

श्री. सागर चोपदार

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – ‘ईडी’च्या कारवाईवरून आमच्या कुटुंबियांवर गलिच्छ आरोप लावले जात आहेत. त्यावरून राजकारण करणे हा चुकीचा प्रकार आहे. यातून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही उगीचच माझ्या कुटुंबियांना त्रास देत आहात. आम्ही कधी तुमच्या (विरोधकांच्या) कुटुंबियांच्या भानगडी काढल्या का ? राज्यपाल कोश्यारी यांना अभिभाषण न करताच माघारी परतावे लागले होते. त्यांचे अभिभाषण होऊ शकले नाही, याची मला खंत आहे, तसेच त्यांना राष्ट्रगीतालाही थांबता आले नाही. एवढा मोठा अवमान आजपर्यंत कधीच या पदावरील व्यक्तीचा झाला नसेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ मार्च या दिवशी ‘अंतिम आठवडा प्रस्तावा’वर ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. विरोधी पक्षातील अनेक जण राज्यपालांकडे तक्रार करण्यासाठी जातात. तो त्यांचा अधिकारही आहे; मात्र त्यासह काही प्रथा-परंपराही लक्षात ठेवायला हव्यात.

२. दाऊद आहे कुठे ठाऊक आहे का कुणाला ? म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार ? राममंदिराचा विषय किती काळ घेतला ? आधी रामाच्या नावाने मते घेतली, आता दाऊदच्या नावाने घेणार आहेत का ? दाऊदच्या घरात घुसून मारा. हिंमत दाखवा. आम्ही देशद्रोहाच्या विरोधात आहोत.

३. कोविडमध्ये ऑक्सिजनची कमतरता असतांना तो कसा मिळवला, केंद्र सरकारने सहस्रो किलोमीटरवरून ऑक्सिजन आणायला लावला, हे राज्यपालांच्या अभिभाषणात होते. रिकामे टँकर एअरलिफ्ट करून रस्ते आणि रेल्वे यांनी ऑक्सिजन मागवण्यात आला. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा कार्यरत होती. भाजपकडून १ मास ‘दाऊद एके दाऊद’ करण्यात आले. राज्यात जी चांगली कामे चालू आहेत, ती दिसत नाहीत.

४. ज्यांसाठी हे करत होतो, ते या योजनांचा लाभ घेत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत, याचेसुद्धा मला समाधान आहे. माझ्या शस्त्रकर्माच्या काळामध्ये माझी उणीव भासू न देता सर्व मंत्र्यांनी उत्तम काम केले.

५. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ म्हणाले. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही, तर सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का ? देशात १ लाख लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वांत अल्प आहेत, तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. हे पाहून आपल्या राज्याची अपर्कीती करायची, हे योग्य नाही.

६. मी मुंबईत जन्म घेतल्याने तिचा मला अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे, ते आम्ही मुंबई येथे करू.