सरकारनेच थकवले वीजदेयकांचे १८ सहस्र कोटी रुपये, राज्यातील थकबाकीची रक्कम १ लाख ९ सहस्र कोटी रुपये !
शेतकर्यांच्या नावाखाली धनदांडग्यांनी वीजदेयके थकवली नाहीत ना ? याचीही सरकारने पडताळणी करावी ! – संपादक
मुंबई, २५ मार्च (वार्ता) – राज्यातील उच्चदाब, घरगुती वापरासाठी दिलेल्या विजेच्या देयकांची ४२ सहस्र २६९ कोटी रुपये, तर रस्ते, दिवा आदी सार्वजनिक सेवांची ६६ सहस्र ८१७ कोटी रुपये अशी एकूण १ लाख ९ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सरकारनेच १८ सहस्र कोटी रुपये थकवले आहेत, अशी माहिती स्वत: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २४ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी महावितरणवरील आर्थिक भार न्यून करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांनी वरील माहिती दिली.
या वेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, ‘‘सरकारकडील थकित वीजदेयकांमध्ये ग्रामविकास विभागाकडून ८ सहस्र ६०० कोटी रुपये येणे आहे. सरकारकडून ही रक्कम मिळावी, यासाठी २४ मार्च या दिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली आहे. सरकारकडून निधी देण्याविषयीची कार्यवाही चालू आहे. थकीत वीजदेयकांची रक्कम मिळण्यासाठी नियमित देयक भरणार्यांसाठी १२ माही, ८ माही आणि ४ माही पीकधारकांप्रमाणे नवीन योजना आणण्यात येणार आहे.’’