सरकारी अधिवक्ता निंबाळकर युक्तीवाद करतांना त्यांनी वापलेल्या ‘ॲसॅसिनेशन’ शब्दावर अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा जोरदार आक्षेप !

अधिवक्ता समीर पटवर्धन

कोल्हापूर, २५ मार्च (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, या मागणीसाठी केलेल्या आवेदनावर सरकारी पक्षाच्या वतीने विशेष अधिवक्ता हर्षद निंबाळकर हे युक्तीवाद करत आहेत. या युक्तिवादात त्यांनी हा ‘खून’ नसून ‘ॲसॅसिनेशन’ आहे, (assassination) असा शब्दप्रयोग केला. या शब्दाला अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘अशा प्रकारचा कोणताही शब्द कायद्याच्या पुस्तकात नसून भारतीय दंडविधान कलम ३०२ साठी ‘खून’ हाच शब्दप्रयोग केला जातो’, असे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी जोरकसपणे सांगितले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू असून पुढील सुनावणी १३ एप्रिल या दिवशी होणार आहे.

कॉ. पानसरे प्रकरणात मारेकरी कोण आहेत ? हा प्रश्न महत्त्वाचा नाही ! – अधिवक्ता निंबाळकर यांचा अजब दावा

कॉ. पानसरे यांची हत्या कुणी केली, हे अद्याप सुस्पष्ट नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या अधिवक्त्यांनी केला आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल ? असे पत्रकारांनी विचारले असता अधिवक्ता हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘‘आमचे स्पष्ट म्हणणे आहे, गोळ्या झाडणार्‍यांपैकी जे दोघे होते, ते म्हणजे सारंग अकोलकर आणि विनय पवार होय. ते सध्या पसार आहेत. हा पुरावा पुढे येणार आहे. हत्येच्या ४ दिवस अगोदर कॉ. पानसरे यांच्या घराच्या बाजूला ‘रेकी’ करण्यात आली. ६ जण ४ दिवस अगोदर वेगवेगळे आजूबाजूला फिरत होते. गुन्ह्याच्या वेळी अजूनही काही दुचाकी तिथे होत्या. मारेकरी कोण आहेत ? हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर आता प्रश्न डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंधुरे यांच्यावर दोषारोपपत्र अंतिम करण्याच्या संदर्भातील आहे.’’