…पण ‘पैशाचा हिशोब देऊ’, असे कुणी म्हणत नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – धाडी पडल्यानंतर ‘यामागे राजकीय डाव आहे’, ‘ही छळवणूक चालली आहे’, ‘यामागे घाणेरडे राजकारण आहे’, आदी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात; परंतु ‘आमच्याकडे असलेल्या पैशांचा हिशोब देऊ’, असे उत्तर दिल्याचे मात्र मी तरी ऐकलेले नाही, असे मार्मिक; परंतु वस्तूस्थिती दर्शवणारे ‘ट्वीट’ हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २३ मार्च या दिवशी केले.
— Ichalkaranjikar V.S. (@ssvirendra) March 23, 2022
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेले ‘ट्वीट’
विविध आर्थिक अपहाराच्या प्रकरणांत केंद्रीय स्तरावरील अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभाग, तर राज्यस्तरावरील गुन्हे अन्वेषण विभाग आदी यंत्रणांकडून टाकण्यात येत असलेल्या धाडी अन् त्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया यांविषयी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी वरील टिपणी केली आहे.
यामध्ये त्यांनी असेही म्हटले आहे, ‘दोन्हींकडून दोन्हीकडे (सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर) धाडी टाकाव्यात. जप्तीची कारवाई करावी. अनधिकृत बांधकामे पाडून टाकावीत. मजुरापासून ते साखरेपर्यंत सगळ्यांचे सहकाराचे कारभार बाहेर आणावेत. अजून काही करायचे असेल, तर तेही करावे. त्यानिमित्ताने काळा पैसा तरी बाहेर येईल. कोण किती कसे खात आहे, कुणाचे हात कुठे पोचले होते ? कुणाचे लागेबांधे कसे आहेत ? हे लोकांना पुनःपुन्हा स्पष्ट होत राहील.’