मिटली खंत गुरुकृपे ।
सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
एकदा ‘गुरुस्मरण’ करतांना मला शरणागतीचे विस्मरण झाले. त्या वेळी जिवाला पुष्कळ खंत वाटली. ‘शरणागतीविना सर्वच कृती (सेवा) अपूर्ण आहेत’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी लक्षात आणून दिले आणि शरण गेल्यावर त्यांनी चुकीची खंतही मिटवली.
वाणीचे थिटेपण कळो आले आज ।
उणा पडे आता शब्दांचा साज ।। १ ।।
दिव्य तेज तुझे अगणित गुण ।
पाहुनिया भांबावले माझे मन ।। २ ।।
वाटले जिवाला शरण तुज जावे ।
तव चरणी एकरूप व्हावे ।। ३ ।।
देखूनी तुला बा सर्व विसरले ।
काही क्षण माझे देहभान हरपले ।। ४ ।।
केले तुझे ध्यान केले बा स्मरण ।
शरणागतीविना सर्व विफल ।। ५ ।।
कासावीस झाले काय करू न कळे ।
अपूर्णतेची खंत जीवा लागे ।। ६ ।।
शरणागतीवीण न लाभे समाधान ।
सर्व भावे देवा आले मी शरण ।। ७ ।।
देई दृढ निष्ठा, शरणागतभाव ।
तुझ्या चरणी देई आता ठाव ।। ८ ।।
काय सांगू देवा तुझी कृपा अनंत ।
गुरुकृपे मिटली माझी खंत ।। ९ ।।
‘देवा, मनाला खंत वाटायला लावणारा आणि मनाची खंत नाहीशी करणाराही तूच आहेस’, हे मला अनुभवता आले. त्यासाठी देवा, तुझ्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !
गुरुचरणी शरणागत,
– सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक