फायनान्स आस्थापनांकडून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील ! – शंभुराज देसाई
नागरिकांची लुबाडणूक करणार्या राज्यातील फायनान्स आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय सदस्यांची मागणी
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – राज्यातील फायनान्स आस्थापनांकडून नागरिकांना त्रास न होण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. पुणे येथील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पुणे शहरातील फायनान्स आस्थापनांचे वसुलीदार नागरिकांना धमकावत असल्याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सर्वपक्षीय सदस्यांनी मागणी केली की, राज्यात सर्व जिल्ह्यांतील फायनान्स आस्थापने नागरिकांना विविध प्रकारे त्रास देऊन धमकावत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
या वेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु, प्रकाश आबिटकर, भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे आणि लक्ष्मण जगताप यांनी भाग घेतला. ‘राज्यातील फायनान्स आस्थापनांतील कर्मचारी आणि अधिकारी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून नागरिकांकडून बळजोरीने पैशांची वसुली करतात. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यानंतर नागरिकांना गुन्हेगारांची वागणूक दिली जाते, तसेच नागरिकांच्या वाहनांची परस्पर विक्री करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, तरीही पोलिसांकडून फायनान्स आस्थापनांतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही’, अशी व्यथा सदस्यांनी मांडली.
त्या वेळी शंभुराज देसाई म्हणाले की, सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. फायनान्स आस्थापने ही खासगी असून रिझर्व्ह बँक त्यांना अनुमती देते. त्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे आम्हाला थेट त्यांच्यावर बंदीची कारवाई करता येत नाही. तरीही सदस्यांच्या मागण्यांचा विचार करून तशी कारवाई करण्यात येईल.