महावितरण आस्थापनाचे भ्रष्ट अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा आदेश !
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – महावितरणच्या सुरक्षा, अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक आणि महावितरणचे मुख्य अन्वेषण अधिकारी सुमित कुमार यांच्यावर भ्रष्टाचार अन् नैतिक अधःपतनाच्या झालेल्या गंभीर आरोपांची नोंद घेत त्यांना निलंबित करण्यात येत आहे, असा आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर बोलतांना दिला.
विधानसभेत शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही लक्षवेधी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे आणि अशोक उईके यांनी भाग घेतला. सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, अधिकार्यांना धमकावणे आणि नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी वरील आमदारांनी डॉ. नितीन राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सुमित कुमार हे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत महावितरणमधील मीटर रिडींग एजन्सी, तसेच अधिकार्यांकडून अनधिकृतपणे पैशांची मागणी करतात. महावितरणमधील विविध अधिकारी आणि कर्मचारी यांना धमकावल्याची ‘रेकॉर्डिंग क्लिप’ उपलब्ध असूनही तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांनी शिक्षा म्हणून त्यांचे केवळ स्थानांतर केले आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य अन्वेषण अधिकारी हे पद बळकावले आहे. त्यांच्या विरोधात कल्याण परिमंडळ अंतर्गत नैतिक अधःपतनाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत, अशी सूत्रे वरील आमदारांनी मांडली.