जैन धर्माचे पू. विनम्रसागरजी महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
आश्रमातील व्यवस्थेमुळे पू. महाराज आणि त्यांचे शिष्य प्रभावित !
पनवेल, २४ मार्च (वार्ता.) – जैन धर्माचे पू. विनम्रसागरजी महाराज यांनी देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला २० मार्च या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी पू. महाराजांसमवेत त्यांचे शिष्यसुद्धा आले होते. या भेटीत त्यांनी आश्रमातील सेवांचे स्वरूप, सेवांचे करण्यात येणारे नियोजन यांची माहिती घेतली. पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे शिष्य यांना संस्थेचे साधक श्री. रूपेश रेडकर यांनी आश्रमातील विविध सेवांविषयी अवगत केले. सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी महाराज यांना सनातन निर्मित हिंदी भाषेतील ‘स्थानकी उपलब्धताके अनुसार औषधीय वनस्पतियोंका रोपण’ आणि ‘औषधीय वनस्पतियोंका रोपण कैसे करे ?’ हे दोन ग्रंथ भेट दिले, तसेच सर्व शिष्यांना प्रसाद दिला.
चौक (जिल्हा रायगड) येथून पायी चालत सकाळी ८ वाजता पू. महाराजांचे आश्रमात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे साधक उपस्थित होते. आश्रमदर्शनाच्या वेळी पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्य यांनी जिज्ञासेने आश्रम पाहून त्यानुसार काही प्रश्नसुद्धा विचारले. आश्रम भेटीनंतर आश्रमातील पूर्णवेळ साधना करणार्या काही साधकांसमवेत त्यांनी आस्थेने संवाद साधला.
आश्रम पाहून पू. विनम्रसागरजी महाराज यांच्या शिष्यांनी दिलेले उत्स्फूर्त अभिप्राय !
१. साधकांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, जवळीक आहे.
२. साधकांचा श्रीकृष्ण आणि श्री गुरु यांच्या प्रति पुष्कळ भाव अन् श्रद्धा आहे.
३. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर एकप्रकारचे समाधान आणि आनंद पहायला मिळाला. कुणीही अप्रसन्न दिसला नाही.
४. आश्रमामध्ये ‘मायक्रोलेव्हल मॅनेजमेंट’ आहे. (म्हणजे लहान लहान गोष्टींचे नियोजनही पुष्कळ उत्तम प्रकारे केलेले आहे.)
५. सर्व गोष्टींचे सूक्ष्म दृष्टीने नियोजन केलेले आहे.
शिकण्याच्या वृत्तीमुळे दैवी बालसाधिका कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) हिची आध्यात्मिक प्रगल्भता आणि तिचे वेगळेपण अचूकपणे टिपणारे पू. विनम्रसागरजी महाराज यांचे शिष्य !पू. विनम्रसागरजी महाराज आणि त्यांचे शिष्य सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. प्रार्थना पाठक हिला भेटले. त्या वेळी त्यांनी कु. प्रार्थनाला विचारलेल्या प्रश्नांची तिने दिलेली उत्तरे ऐकून सर्वांना तिच्यातील साधनेचे गांभीर्य, भावपूर्ण आणि नम्रतेने उत्तर देण्याची पद्धत, उत्तरातील प्रगल्भता तसेच आध्यात्मिक स्तरावर असणारी विचारप्रक्रिया पाहून आश्चर्य वाटले. सर्व जण पुष्कळ प्रभावित झाले. एक शिष्य म्हणाले, ‘‘कु. प्रार्थना हिची प्रगल्भता पाहून आम्ही तिला प्रश्न विचारू शकत नाही. पू. महाराज, आपणच हिला प्रश्न विचारा.’’ दुसरे शिष्य म्हणाले, ‘‘प्रार्थनाला पाहून मला संत मीराबाईंची आठवण झाली.’’ |
जिज्ञासू वृत्तीने सनातनचा आश्रम पाहून त्याविषयी कौतुक करणारे पू. विनम्रसागरजी महाराज !
१. ध्यानमंदिरातील सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे पाहून त्यांना पुष्कळ चांगले वाटले. गणपतीच्या प्रतिमेला दुर्वा आणि लाल फूल वाहिले होते. शिवाच्या चित्राला पांढरे फूल आणि बेल वाहिले होते. याचे कारण काय ? त्यामागील शास्त्र काय आहे ? आदी प्रश्न त्यांनी जिज्ञासेने विचारले.
२. चप्पल ठेवण्यापासून ते धान्य साठवण्याची व्यवस्था, स्वयंपाकगृहातील अन्नपदार्थ ठेवण्याची पद्धत त्यांना आवडली.
३. विविध सेवांच्या व्यवस्थापनातील बारकावे जाणून घेतले.
४. काटकसरीमुळे अल्प व्ययात अधिक कार्य कसे करता येते ? हे पाहून त्यांना कौतुक वाटले.
५. आश्रमाच्या लादीवर उमटलेल्या ॐ मागील अध्यात्मशास्त्र त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले.
६. आश्रमामध्ये साधक प्रतिदिन स्वतःच्या चुका फलकावर लिहितात. फलक पाहून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया कशी करायची ?, याविषयी अधिक माहिती कुठे मिळेल ?, एखादी सारणी पहाता येईल का ? हे प्रश्न त्यांनी विचारले.
७. आश्रमातील स्वच्छता, व्यवस्थितपणा यांमुळे ते प्रभावित झाले.
८. आश्रमातील अनेक जणांच्या अल्पाहाराची सिद्धता सकाळी कशा प्रकारे करतात ? हे पाहून त्यांना कौतुक वाटले.
पू. विनम्रसागरजी महाराज यांनी त्यांच्या शिष्यांना सनातनच्या आश्रमातील नियोजन आदी भाग शिकण्यासाठी आणणे !पू. विनम्रसागरजी महाराजांनी काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सनातनच्या आश्रमातील सर्व व्यवस्था पुष्कळ आवडली होती. आश्रमातील नियोजन, तसेच शिस्त यांचा लाभ त्यांच्या शिष्यांना व्हावा, यासाठी पू. महाराजांनी त्यांच्या काही शिष्यांना सनातनच्या आश्रमातील नियोजनादी भाग पाहून तो शिकून घेण्याच्या उद्देशाने आश्रम भेटीसाठी आणले होते. |