परमबीर सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करावे !
सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश !
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआयकडे) हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. याआधी ‘महाराष्ट्र पोलीस याचे अन्वेषण करतील’, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे यात पालट झाला आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची २४ मार्च या दिवशी सुनावणी झाली.
या सुनावणीनंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. ‘नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वसाठी या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. या प्रकरणात गुंतलेले कुणीही स्वच्छ आहेत’, असे आमचे म्हणणे नाही’, असेही न्यायमूर्ती म्हणाले.