मथुरा (उत्तरप्रदेश) येथे होणारे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मप्रेमींकडून ग्रामदैवत श्री भूतेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना !
मथुरा – येथे २७ मार्च या दिवशी होणारे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आणि धर्मकार्यास ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मथुरानगरीचे ग्रामदैवत श्री भूतेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद गुप्ता यांनी समितीचे माहितीपत्रक, श्रीफळ आणि पुष्प महादेवाच्या चरणी अर्पण केले. या वेळी सनातन संस्थेच्या सुश्री (कु.) पूनम किंगर, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम उत्तरप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके, श्री. देवेन पाटील आदी उपस्थित होते.
या अधिवेशनामध्ये ‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे, धर्मावर होत असलेल्या आघातांचा अभ्यासपूर्वक प्रतिवाद कसा करावा ?’, आदी विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
यानंतर परिसरातील श्री उमाकात्यायनीदेवीचेही दर्शन घेऊन प्रार्थना करण्यात आली. देवीचे हे स्थान जागृत असून देवीच्या ५१ शक्तिपिठांपैकी एक आहे. येथे देवी सतीचे केस पडल्याचा उल्लेख पुराणात आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
१. श्री भूतेश्वर महादेव मंदिरातील पुरोहितांना ‘गर्भगृहात नारळ अर्पण करू शकतो का ?’, असे विचारल्यावर त्यांनी प्रारंभी नकार दिला. त्या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी बाहेरून श्री भूतेश्वर महादेवाला प्रार्थना केली. त्यानंतर पुरोहितांनी स्वत:हून येऊन ‘तुमच्यापैकी एक जण गर्भगृहामध्ये जाऊन श्रीफळ अर्पण करू शकता’, असे सांगितले.
२. समितीचे श्री. लुकतुके यांनी पुरोहितांना ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनातील सर्व विघ्ने दूर व्हावीत आणि देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत’, असे सांगितल्यावर पुरोहित म्हणाले, ‘‘हे दिव्य कार्य आहे. तुम्ही भूतेश्वर महादेवाकडे साकडे घातले आहे. तुमचे कार्य केवळ यशस्वीच नाही, तर भव्य होऊन पुढे इतिहास बनेल. प्रारंभी मी तुम्हाला गर्भगृहात जाण्यास मनाई केली; पण नंतर अंतर्मनातूनच मला असा विचार आला की, तुम्हाला आत जाऊ द्यावे.’’
३. श्री उमाकात्यायनीदेवीचे मंदिर भूमीखाली गुहे समान जागेत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी देवीला सामूहिक प्रार्थना केल्यावर मंदिरात ढोल-मंजिरी वादन चालू झाले. त्या वेळी ‘देवीनेच हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आशीर्वाद आणि शक्ती दिली’, असे उपस्थितांना जाणवले. या वेळी धर्मप्रेमींना श्री दुर्गादेवी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दैवी अस्तित्व जाणवले.