पेनड्राईव्ह प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी व्हावी ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – गेल्या आठवड्यात विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘पेनड्राईव्ह’च्या माध्यमातून मोठा खुलासा केला होता. यात भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांना जाणून-बुजून एका प्रकरणात अडकवण्यासाठी कशा पद्धतीचे षड्यंत्र रचण्यात आले. याविषयी १२५ घंट्यांचे ध्वनीमुद्रण पेनड्राईव्हमध्ये होते. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पुणे येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तत्कालीन सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.
याविषयी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, या प्रकरणाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले आहेत, ते पहाता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी उच्च न्यायालयात १ जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण सीआयडीऐवजी सीबीआयकडून करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.