ठेकेदार राष्ट्रीय महामार्गाची कामे करत नाहीत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री
केवळ खंत व्यक्त करण्यापेक्षा ठेकेदारांवर काय कारवाई करणार, तेही जनतेला समजायला हवे !
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय महामार्ग खराब झाले आहेत. ठेकेदार लक्ष देत नाहीत, कामे करत नाहीत, अशी खंत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. २३ मार्च या दिवशी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयीचा तारांकित प्रश्न आमदार अरुण लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देतांना चव्हाण यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लक्ष ठेवून आहेत. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासाठी १ सहस्र ६८५ हेक्टर भूमी संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. याविषयी सर्वेक्षण चालू आहे. रस्त्याच्या भूमीच्या संपादनामध्ये भूमीधारकांना चांगले पैसे मिळतील. भूमी संपादनासाठी सल्लागारांची नियुक्ती केली असून याविषयीचा अहवाल सिद्ध करण्यात येत आहे. पूर्वीच्या रस्त्याची लांबी ८३० किलोमीटर आहे. नवीन रस्त्यामध्ये १३१ किलोमीटर अंतर न्यून होणार आहे.’’