जिहादी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेले पहिले काश्मिरी नेते : पंडित टीकालाल टपलू
माझ्या मित्रासोबत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर चर्चा चालू होती. त्यात प्रमुख भूमिका केलेले अभिनेते अनुपम खेर हेही मूळ काश्मीरचेच आहेत. या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे, ‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर टीकालाल टपलू हे सर्वांत लोकप्रिय नेते होते; म्हणून आतंकवाद्यांनी त्यांना आधी मारले; कारण आधी नेतृत्व मारले की, नंतरच्या गोष्टी सोप्या होतात.’
१. पंडित टीकालाल टपलू यांना समाजाच्या प्रत्येक घटकाचे समर्थन !
वर्ष १९३० मध्ये जन्मलेले पंडित टीकालाल टपलू हे एम्.ए., एल्.एल्.बी. झाले. प्रखर स्वयंसेवक असलेले टपलू कारागृहातही गेले होते. काश्मीर प्रदेश भाजपचे (त्या वेळेच्या जनसंघाचे) उपाध्यक्षही होते. जम्मू आणि काश्मीर खोर्यात त्यांचा बराच बोलबाला होता. समाजातील प्रत्येक घटकाचे त्यांना समर्थन होते. तो काळ काश्मीरमधील शांततेचा काळ होता.
२. काश्मीरमध्ये ९० च्या दशकात जिहादी कारवायांमध्ये वाढ !
काही वर्षांनी काश्मीरमध्ये खळबळ चालू झाली. जर कुणी रेशन आणायला गेले, तर ‘इन्शाअल्ला अगला रेशन इस्लामाबादसे ।’ (अल्लाच्या कृपेने पुढील रेशन पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथून मिळेल; म्हणजेच काश्मीर पाकिस्तानचा भाग असेल), असे ऐकू येऊ लागले. जिहादी संघटना ‘जे.के.एल्.एफ्.’ची भित्तीपत्रके ठिकठिकाणी दिसू लागली होती. या संघटनेत जिहाद्यांची भरती चालू झाली. ‘मुजाहिदीन’ (जिहादी कारवाया करणारा गट) हा शब्द कानावर पडू लागला. जिहादी संघटना फतवे काढू लागल्या.
३. काश्मिरी हिंदूंवर दहशत बसवण्यासाठी टीकालाल टपलू यांची क्रूर हत्या !
याविषयीची माहिती देहलीत असलेल्या टपलू यांना समजली. १९८९ च्या सुमारास स्वत:च्या कुटुंबियांना देहलीत सोडून काश्मिरी पंडितांच्या साहाय्यासाठी टपलू काश्मीरमध्ये पोचले. ‘काश्मिरी हिंदूंना माझी मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल’, असे त्यांना त्या वेळी वाटले नव्हते. १२ सप्टेंबर १९८९ या दिवशी त्यांच्या घरावर आक्रमण झाले. त्यांनी न घाबरता बाहेर येऊन आतंकवाद्यांना आव्हान दिले. आतंकवादी हत्या करण्यासाठी एक लोकप्रिय हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीचा शोध घेत होते. ‘अशा लोकप्रिय व्यक्तीला मारल्यास काश्मीरमध्ये दहशत माजवता येईल’, हा त्यांचा उद्देश होता. पंडित टीकालाल टपलू यांच्याविना त्यांच्या दृष्टीस इतर कुणी नव्हते. जिहादी आतंकवाद्यांनी १४ सप्टेंबर १९८९ या दिवशी कित्येकांच्या समोर टपलू यांच्यावर बेछूट गोळीबार करतून त्यांच्या शरिराची चाळण केली.
पंडित टीकालाल टपलू हे पहिले काश्मिरी पंडित होते, ज्यांची हत्या केली गेली. त्यानंतर हे सत्र अखंड चालूच राहिले. स्त्रियांवरील अत्याचारांविषयी तर विचारायलाच नको. काश्मिरी पंडितांमध्ये हुतात्मा टपलू यांच्याविषयी बराच आदर आहे. प्रत्येक वर्षी १४ सप्टेंबर या दिवशी त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. अशा या महान पंडिताला अभिवादन !
– श्री. गुरुदास कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा.