हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची घेतली भेट !

हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

पंडित सुरेंदर शर्मा (उजवीकडे) यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

फरिदाबाद – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान चालू आहे. या अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची भेट घेतली. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना भेटून पंडित शर्मा यांना पुष्कळ आनंद झाला. या वेळी पंडित शर्मा यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे पंडित शर्मा यांना म्हणाले, ‘‘समाज पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आहे. आज हिंदू त्यांचा वाढदिवसही शास्त्रीय आधार नसलेल्या इंग्रजी कालगणनेप्रमाणे साजरा करतात. वास्तविक तिथीनुसार वाढदिवस साजरा केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे उदाहरण समाजाला धर्माचरण करण्यासाठी प्रवृत्त करू शकते.’’
यावर पंडित शर्मा यांनी सांगितले, ‘‘तुम्ही हे पुष्कळ महत्त्वाचे सूत्र सांगितले. यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करू. आम्ही फरिदाबादमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले, तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नक्की बोलावू, तसेच आपण एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्म जागृतीचे
कार्य करू.’’