रशियाला शह देण्यासाठी ‘नाटो’ ४ तुकड्या पाठवणार

‘नाटो’च्या शिखर संमेलनात निर्णय

‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग

ब्रुसेल्स (बेल्जियम) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. यामध्ये सर्व युरोपीय सदस्य देशांच्या प्रमुखांसमवेतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही सहभागी झाले आहेत. या बैठकीमध्ये रशियाला शह देण्यासाठी पूर्व युरोपमध्ये रशियाच्या पश्‍चिम सीमेजवळ नाटोच्या सैन्याच्या ४ मोठ्या तुकड्या पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी सांगितले की, स्लोवाकिया, हंगरी, बल्गेरिया आणि रोमेनिया या देशांमध्ये नाटोचे सैन्य पाठवण्यात येईल.

जागतिक समुदायाने युक्रेनला पाठिंबा देण्याचे झेलेंस्की यांचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी युद्धाला आरंभ होऊन एक मास झाल्याच्या निमित्ताने जागतिक समुदायाला रस्त्यावर उतरून युक्रेनला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ‘सर्व देशांनी युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी रशियावर अधिकाधिक कठोर निर्बंध लादले पाहिजेत. युक्रेनच्या साहाय्यासाठी आम्ही ६०० क्षेपणास्त्रे पाठवणार आहोत’, असे सांगितले.

रशियावरील निर्बंधांमध्ये वाढ !

ब्रिटनने रशियाच्या आणखी ६ अधिकोषांवर (बँकांवर) निर्बंध लादले आहेत. यांमध्ये ‘अल्फा बँके’चाही समावेश आहे. यासह युक्रेनमधील मेलिटोपोल येथील रशियाने नियुक्त केलेल्या महापौरांवरही ब्रिटनने निर्बंध लादले आहेत. बोरीस जॉन्सन यांनी म्हटले की, आतापर्यंत रशियाला पाठिंबा देणार्‍या १ सहस्र व्यवसायिकांवर त्यांच्या देशाने निर्बंध लादले आहेत.

रशियाकडून युक्रेनच्या ‘इजियम’  शहरावर नियंत्रणाचा दावा !

रशियाने २४ मार्चच्या सकाळी युक्रेनच्या खारकीव क्षेत्रातील ‘इजियम’ या शहरावर नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी केला. ‘इजियम’ शहर हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.

रशियाचे विशाल जहाज नष्ट केल्याचा युक्रेनी नौदलाचा दावा !

दक्षिण-पूर्व युक्रेनमधील समुद्रकिनारी वसलेल्या आणि सध्या रशियाच्या नियंत्रणात असलेल्या बरदियांस्क शहरातील ‘ओर्स्क’ नावाचे रशियाचे विशाल जहाज नष्ट केल्याचा दावा युक्रेनी नौदलाने केला आहे.