मंदिरात येणारे व्हीआयपी लोक भक्तांना अडचणी निर्माण करत असतील, तर देव त्यांना क्षमा करणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? व्हीआयपी लोकांना आणि मंदिर प्रशासनाला का कळत नाही ? – संपादक
चेन्नई (तमिळनाडू) – मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारी अतीमहनीय मंडळी (व्हीआयपी) जर भक्तांच्या अडचणींना कारण ठरत असतील, तर असे लोक पाप करत आहेत. देव त्यांना क्षमा करणार नाही, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस्.एम्. सुब्रह्मण्यम् यांनी एका याचिकेवर सुनावणी करतांना केले. तमिळनाडू राज्यातील तूतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदुर येथील प्रसिद्ध अरुलमिगु सुब्रमनिया स्वामी मंदिराशी संबंधित याचिकेवर ही सुनावणी करण्यात आली.
मंदिरों में VIP कल्चर पर सवाल, मद्रास हाईकोर्ट ने कहा- यह भक्तों को सबसे ज्यादा निराश करने वाला#VIPCulture | #MadrasHighCourt | #Templeshttps://t.co/6HeOQsStWH
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) March 24, 2022
मद्रास उच्च न्यायालयाने केलेली विधाने
१. व्हीआयपी संस्कृतीमुळे, विशेष करून मंदिरांमध्ये लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. व्हीआयपी प्रवेश सुविधा केवळ संबंधित व्यक्तींनाच किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच मिळाली पाहिजे, त्यात अन्य नातेवाइकांचा समावेश असू नये.
२. विविध सरकारी विभागांमधील अतीमहनीय व्यक्तींच्या श्रेणींमध्ये येणारे अधिकारी, त्यांच्या समवेत येणारे लोक, तसेच अन्य विशेष भक्त, अर्पणदाते यांना स्वतंत्र रांग लावून दर्शनाची सुविधा दिली जाऊ नये.
३. काही लोकांना विशेष दर्शनाची सुविधा दिली पाहिजे, यात संशय नाही; मात्र जे विशेष पदावर कार्यरत आहेत, त्याच लोकांना ती मिळावी. बहुतेक विकसित देशांमध्ये केवळ उच्च पदांवर असलेल्या लोकांना सुविधा दिल्या जातात. या लोकांना राज्यघटनेद्वारे माहनीय ठरवण्यात आलेले असते. अशा प्रकारची सुविधा लोकांच्या समानतेच्या अधिकारामध्ये अडथळा ठरू नये.
४. मंदिरासारख्या ठिकाणी व्हीआयपी दर्शन सुविधेमुळे भक्तांना त्रास होतो आणि ते व्यवस्थेवर टीका करतात. मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था अशा प्रकारे करावी ज्यामुळे सामान्य भक्तांना त्याचा कोणताही त्रास होऊ नये.
५. तमिळनाडू सरकारने व्हीआयपी लोकांची सूची बनवलेली आहे. व्हीआपी लोकांच्या समवेत सुरक्षारक्षक आणि कर्मचारी असतात. अशा वेळी व्हीआयपीसमवेतच्या लोकांना विशेष दर्शन सुविधा देण्यात येऊ नये. कर्मचार्यांना सामान्य रांगेमध्ये किंवा शुल्क भरून दर्शन घेण्यासाठी सांगण्यात यावे.
६. भक्त त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे देवाला प्रार्थना करत असतात. अशा वेळी त्यांच्यात कोणताही भेदभाव केला जाऊ नये. जर व्हीआयपी लोक दर्शनासाठी येत असतील, तर त्यांनी भक्त म्हणून यावे.