कोटकामते (जि. सिंधुदुर्ग) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद
३६ लाख ८१ सहस्र १०५ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप
प्रशासनाचे असे एकतरी क्षेत्र आहे का, जिथे भ्रष्टाचार होत नाही ? – संपादक
देवगड – तालुक्यातील कोटकामते ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर २२ मार्च या दिवशी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचार्यांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने लढा दिला होता. अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले असून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०१९ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ३६ लाख ८१ सहस्र १०५ रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी देवगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. देवगड तालुक्यात शिक्षण विभागात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याच्या पाठोपाठ कोटकामते ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघड होण्याची ही दुसरी घटना आहे. कोटकामते ग्रामपंचायतीमध्ये १ एप्रिल २०१९ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत पाणीपुरवठा योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना, अनुसुचित जाती, जमाती आणि नवबौद्ध विकास योजना यांच्या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.