कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) टपाल कार्यालयाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक
अल्पबचत एजंट पूजा रुद्रे यांच्या विरोधात गुन्हा नोंद
आतापर्यंत विश्वासार्ह वाटणार्या टपाल खात्यातही भ्रष्टाचार होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेने गुंतवणूक कुठे करावी ? हा प्रश्न निर्माण होत आहे – संपादक
कुडाळ – येथील टपाल कार्यालयाची बनावट पासबूक बनवून १ कोटी १ लाख ५९ सहस्र रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी येथील अल्पबचत एजंट पूजा संदीप रुद्रे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी मालवण येथील डाक निरीक्षक सचिन राजाभाऊ पानढवळे यांनी तक्रार केली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रेमचंद मेंगडे यांनी दिली. (आतापर्यंत सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येते; मात्र टपाल खाते याला आतापर्यंत अपवाद ठरत होते. त्यामुळे जनतेचा टपाल खात्यातील गुंतवणुकीवर अधिक विश्वास आहे. आता टपाल खात्यातही भ्रष्टाचार होऊ लागला आणि सर्वसामान्य जनतेचे पैसे हडप होऊ लागले, तर जनतेने गुंतवणूक करायची तरी कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. – संपादक)
पानढवळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पबचत एजंट पूजा संदीप रुद्रे यांनी १४ मार्च २०१५ ते २४ मे २०१९ या कालावधीमध्ये एकूण १०४ बनावट पासबूक बनवून ३६ ठेवीदारांकडून १ कोटी १ लाख ५९ सहस्र रुपये घेऊन ही रक्कम टपाल खात्यात जमा न करता ती स्वतःसाठी वापरली. बनावट पासबूक बनवून टपाल कार्यालयातील साहाय्यक ‘पोस्टमास्तर’ यांच्या पदाचा रबरी शिक्क्याचा वापर करून गैरव्यवहार केला. टपाल खाते आणि ठेवीदार यांची फसवणूक केली म्हणून त्यांचे टपाल खात्याचे व्यवहार रहित करण्यासाठी आणि त्यांची ‘एजन्सी’ बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले होते. त्यानुसार २३ जून २०१९ या दिवशी रुद्रे यांची नेमणूक रहित करण्यात आली. फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पूजा रुद्रे यांच्या विरोधात टपाल कार्यालयात तक्रार दिली होती; मात्र हा अपहार उघड झाल्यानंतर रुद्रे यांनी ठेवीदारांशी संपर्क साधून त्यांची रक्कम त्यांना परस्पर दिली. त्यामुळे ठेवीदारांनी पूजा रुद्रे आणि टपाल विभाग यांच्याविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी निवेदन दिले आहे. (ठेवीदारांनी रक्कम मिळाल्यावर तक्रार नसल्याचे लिहून दिले, अशामुळेच फसवणूक करणार्यांना वचक बसत नाही. जनता अशी वागते म्हणूनच भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. – संपादक)