हिंदूंनी मागणी केली, तरच हिंदु राष्ट्र मिळेल ! – परमहंस डॉ. अवधेशपुरीजी महाराज, स्वस्तिकपीठाधिश्वर, मध्यप्रदेश
हिंदूसंघटन, धर्मशिक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
उज्जैनमध्ये (मध्यप्रदेश) ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’त संघटित कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय !
उज्जैन – स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या आधारे देश चालत आहे. असंवैधानिक काही होऊ नये, यासाठी हिंदू जागरूक असतो. जर राज्यघटना सर्वांना समान अधिकार देते, तर मग पंथाच्या आधारावर वेगळ्या सुविधा आणि सवलती कशाला हव्यात ? ही परिस्थितीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता स्पष्ट करते. आईही मुलाला दूध मागितल्याखेरीज पाजत नाही. त्यामुळे आपण जर हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर ते आपल्याला कोण देईल ? असे प्रतिपादन स्वस्तिकपीठाधिश्वर परमहंस डॉ. अवधेशपुरीजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी येथील महाराष्ट्र समाज धर्मशाळेच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनासाठी मध्यप्रदेशमधील अखिल भारतीय शिवसेना गौ रक्षा न्यासाचे श्री. मनीष चौहान, इतिहास संकलन समितीचे श्री. अभय मराठे, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नंदकिशोर पाटीदा, श्री. राकेश वनवट, प्राध्यापक श्री. योगेश कुल्मी यांच्यासह १२ संघटनांच्या प्रतिनिधींसह अन्य अनेक धर्मनिष्ठ उपस्थित होते. तसेच या अधिवेशनाला देहली येथून ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हेही उपस्थित होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे श्री. प्रथमेश वाळके यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. स्मिता कुलकर्णी आणि श्री. शिवम सोनी यांनी केले. या वेळी गटचर्चेच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रासाठी कोणता समान कृती कार्यक्रम राबवू शकतो ?’, याविषयी नियोजन करण्यात आले.
सर्व संघटनांना एका धाग्यात गुंफण्याचे कार्य हिंदु जनजागृती समितीचा प्रयत्न अभिनंदनीय ! – परमहंस डॉ. अवधेशपुरीजी महाराजहिंदूंना संघटित करण्यासाठी एका निष्पक्ष संस्थेची आवश्यकता होती. आज हिंदु जनजागृती समिती निष्पक्षपणे सर्व संघटनांना एका धाग्यात गुंफण्याचे कार्य करत आहे. समितीचे हे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. |
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदु समाजाने क्षात्रतेजाची उपासना करायला हवी ! – अरविंद जैन, प्रांतीय उपाध्यक्ष, हिंदु शौर्यजागरण मंच, उज्जैन
सध्याची परिस्थिती पहाता हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तत्पर रहायला हवे. हिंदु समाज स्वतःतील क्षात्रतेज विसरला आहे. तथाकथित अहिंसेचा प्रचार करून हिंदूंना अजून षंढ बनवले गेले. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आज हिंदु समाजाने क्षात्रतेजाची उपासना करायला हवी.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी निरंतर आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समितीभारतात सुराज्य निर्माण करण्यासाठी लोकशाहीतील वर्तमान दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने आपल्याला संघर्ष करायला हवा. त्यासह वैचारिक स्तरावर हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रसार व्हायला हवा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संघटनांचे निरंतर आणि संघटित प्रयत्न अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहेत. पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद विसरून धर्माला प्रमुख मानून निष्कामपणे धर्माचे कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे. |
अधिवेशानाला उपस्थित अन्य मान्यवर
श्री. दत्तप्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापक पुजारी, श्री क्षेत्र बांगर, देवास; अधिवक्ता लोकेंद्र मेहता, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु भगवा वाहिनी, उज्जैन; सौ. राजश्री जोशी, अध्यक्षा, महाराष्ट्र समाज, उज्जैन; श्री. प्रमोद शर्मा, राष्ट्रीय मंत्री आणि मध्यप्रदेश प्रभारी, अखिल भारतीय हिंदू महासभा; श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था; श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती; श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
|
अधिवेशातील अन्य मान्यवरांनी केलेले उदबोधन !
‘सेक्युलर’ (निधर्मी) देशात एकाही चर्चवर किंवा मशिदीवर हिंदु अध्यक्ष का नाही ? – श्री. दत्तप्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापक पुजारी, श्री क्षेत्र बांगर, देवास
हिंदु मंदिरांच्या विश्वस्तांचे दायित्व आहे की, मंदिर हे धर्मशिक्षण आणि धर्मरक्षणाचे केंद्रबिंदु बनले पाहिजे. मंदिरांवर अल्पसंख्यांक समाजाचा अध्यक्ष बनू शकतो, तर या ‘सेक्युलर’ (निधर्मी) देशात एकाही चर्चवर किंवा मशिदीवर हिंदु अध्यक्ष का नाही ? मंदिरांच्या सरकारीकरणाचे भयंकर दुष्परिणाम आहेत. ‘मंदिरातील निधीचा धर्माच्या उत्थानासाठी का होत नाही ?’, असा प्रश्न आज सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे.
अधिवक्ता लोकेंद्र मेहता, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु भगवा वाहिनी, उज्जैन
आज उज्जैनची स्थिती अत्यंत दयनीय आहे. आज हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार असूनही महाकाल परिसरातील हिंदूही सुरक्षित नाहीत. मी राष्ट्रपती आणि सर्व महत्त्वाच्या राज्यघटनात्मक पदावरील लोकांना लेखी निवेदन केले आहे की, महाकाल परिसरात अवैध भोंग्यांच्या माध्यमातून चाललेले ध्वनीप्रदूषण थांबले पाहिजे. यासाठी मी कायदेशीर लढाई लढत आहे.
हिजाबसंबंधी चालू असलेले षड्यंत्र आपण (हिंदूंनी) उधळून लावायला हवे ! – सौ. राजश्री जोशी, अध्यक्षा, महाराष्ट्र समाज, उज्जैन
हिजाबसंबंधी चालू असलेला वाद केवळ षड्यंत्र आहे. हिजाब घालणे इस्लाममध्ये ही सक्तीचे नाही. कर्नाटक उच्च न्यायालयानेही हे स्पष्ट केले आहे. या षड्यंत्रामागे देशविरोधी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही धर्मांध संघटना असून असे षड्यंत्र आपण (हिंदूंनी) उधळून लावायला हवे.
श्री. प्रमोद शर्मा, राष्ट्रीय मंत्री आणि मध्यप्रदेश प्रभारी, अखिल भारतीय हिंदू महासभा
हिंदु राष्ट्रासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे. सर्वांना संघटित करण्याचा प्रयत्न प्रारंभ आम्ही केला असून नियोजनबद्ध प्रयत्नांतूनच हे शक्य आहे.
‘हिंदु राष्ट्र’ हा केवळ विचार नसून व्रत आहे ! – श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
अनेक जण म्हणतात, ‘भारत हिंदु राष्ट्रच आहे’; पण जर घराचा मालकी अधिकार नसेल, तर त्या घराला आपण स्वतःचे कसे म्हणू शकतो ? जरी हे हिंदु राष्ट्र असले, तरी राज्यघटनेत जोपर्यंत हा पालट होत नाही, तोपर्यंत हे राष्ट्र सनातन धर्मानुसार कसे चालेल ? त्यामुळे राज्यघटनेत अधिकृतरित्या ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा समावेश होणे आवश्यक आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हा केवळ विचार नसून व्रत आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित भावाने प्रयत्न करायला हवेत.
आत्मबळासाठी साधनाच करणे आवश्यक ! – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
आत्मबळ बाजारातून विकत घेता येत नाही, त्यासाठी साधनाच करावी लागते. कुलदेवीचा नामजप आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक आहे. नामजपासह जेव्हा आपण धर्माचे कार्य करू, तर त्याला यश मिळेल आणि आपली साधनाही होईल.
‘हिंदु राष्ट्र’ आदर्श राज्यव्यवस्था असून ती सर्व हिंदूंपर्यंत पोचवायला हवी ! – श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्रासाठी संघटित आणि नियोजनबद्ध प्रयत्न होण्यासाठी अधिवेशन आयोजित केले आहे. आज अनेकांना हिंदु राष्ट्राची संकल्पना राजकीय वाटते; पण संपूर्ण विश्वाला सुसंस्कृत करण्याचा उद्घोष केवळ हिंदु धर्म करतो. अशा धर्माच्या आधारावर असलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना राजकीय कशी असेल ? ती एक आदर्श राज्यव्यवस्था आहे, हे आपल्याला हिंदूंपर्यंत पोचवायला हवे.