हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !
मागील वर्षभरात जुगाराच्या ४२९, तर मद्याच्या १ सहस्र ६० तक्रारी !
एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल ! – संपादक
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – हिंगोली जिल्ह्यातील जुगार, मद्य, मटका, गुटखा विक्री आदी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात अनेक ठिकाणी जुगार आणि मटका मोठ्या प्रमाणात चालू असून ते रोखण्याविषयीची लक्षवेधी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी सभागृहात उपस्थित केली. यावर उत्तर देतांना शंभूराज देसाई यांनी वरील घोषणा केली.
वर्ष २०२१ मध्ये हिंगोली जिल्ह्यात जुगाराच्या ४२९, तर मद्यबंदीच्या १ सहस्र ६० तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी सेनगाव येथे धाड टाकून २ गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईत ३६ आरोपींना कह्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख ७३ सहस्र ४०० रुपये कह्यात घेतले. या प्रकरणात बीट अंमलदारांचे निलंबन करण्यात आले. परराज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्यात येईल. अवैध धंदे रोखण्यासाठी गुप्त विभागातील पोलिसांचेही साहाय्य घेण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या सर्व प्रभारींना त्यांच्या भागात मोहीम घेण्याची सूचना देण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी त्यांचा संपर्क क्रमांक प्रसारित केला असून अवैध धंदे आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात अवैध धंद्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेतल्यास त्याविषयी तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले असल्याचे या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.