राज्यातील १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र चालू करण्यासाठी निविदा काढली जाईल ! – दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन
राज्यात १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे आमदार अप्रसन्न !
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – राज्यात लातूर, बीड, नांदेड, धाराशिव, वाशिम, अशा एकूण १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र चालू करण्यासाठी ३ मासांत निविदा काढली जाईल, तसेच हे सेतू केंद्र चालू करण्यामध्ये कामचुकारपणा करणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २२ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी लातूर येथे सेतू सुविधा केंद्र बंद असल्याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्या वेळी ते बोलत होते.
राज्यात १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र नसल्याविषयी सदस्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘सेतू केंद्र नसल्याने अनेक लोकांची कामे होत नाहीत, लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. याविषयी प्रशासन गांभीर्याने निर्णय का घेत नाही ? सेतू केंद्र चालू न करणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी अनेक सदस्यांनी सभागृहात केली, तसेच या प्रश्नाचे प्रारंभी समाधानकारक उत्तर न दिल्याने सदस्यांनी मंत्री भरणे यांना धारेवर धरले.