सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणारे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी अविरतपणे झटणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
१. अल्प घंटे झोप घेऊनही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सतत उत्साही असून दिवसभर कार्यरत असणे
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ पूर्वी ६ घंटे झोपायचे. नंतर हळूहळू ५ घंटे झोपून आता ते केवळ ४ घंटेच झोपतात, तरीही ते सतत उत्साही असतात. एवढी अल्प झोप घेऊनही ते दिवसभर कार्यरत असतात. त्यांना उठण्यासाठी गजर (अलार्म) लावण्याची आवश्यकता नसते. त्यांना झोपल्यानंतर ४ घंट्यांनी जाग येतेच. ‘ते दैवीच आहेत’, असे वाटते.
२. वक्तशीरपणा आणि नियमितता
मी सद्गुरु गाडगीळकाकांना ६ वर्षांपासून पहात आहे. आजपर्यंत त्यांच्या दिनक्रमात कधीच पालट झाला नाही. ते ठरलेल्या वेळेत कृती करतात. ते खोलीतील सर्व सेवा एकट्याने नियमितपणे करतात.
३. जिज्ञासा
एकदा एक संत नामजप करतांना एका साधिकेला त्रास देणार्या अनिष्ट शक्तीला त्रास होऊ लागला. सद्गुरु गाडगीळकाकांनी दुसर्या दिवशी साधिकेला ‘‘तुम्हाला कसे वाटले ? तुम्हाला संत नामजप करत असतांना काय जाणवले ?’’, असे प्रश्न विचारून जिज्ञासूपणे तिची प्रत्येक टप्प्याची स्थिती जाणून घेतली.
४. प्रीती
४ अ. साधकांना कोणत्याही वेळी आध्यात्मिक त्रास झाल्यास सद्गुरु डॉ. गाडगीळकाका लगेच त्यांना नामजपादी उपाय सांगत असल्याने साधकांना त्यांचा आधार वाटणे : साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास ते सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारतात. साधकांना नामजपादी उपाय शोधून देतांना सद्गुरु काकांना वेळेचे भान रहात नाही. ते साधकांसाठी घंटोन्घंटे नामजपादी उपाय शोधतात. काही वेळा त्यांची महाप्रसाद ग्रहण करण्याची वेळही टळून गेलेली असते. ते साधकांना रात्री-अपरात्रीही तेवढ्याच उत्साहाने नामजपादी उपाय शोधून देतात. त्यामुळे साधकांना कितीही आध्यात्मिक त्रास झाला, तरी सद्गुरु काकांचा त्यांना आधार वाटतो.
५. ‘सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास नाहीसा होतो’, याची साधकांना प्रचीती येते.
६. साधकांमधील आत्मविश्वास वाढवून त्यांना प्रोत्साहन देणे
अ. साधक सद्गुरु काकांच्या खोलीत गेल्यावर काका त्यांच्याकडून निरनिराळे सूक्ष्मातील प्रयोग करून घेतात. साधकांची उत्तरे योग्य असल्यास सद्गुरु काका साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात.
आ. स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास मी सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारते. तेव्हा सद्गुरु काका मला त्या साधकांसाठी नामजपादी उपाय शोधायला सांगतात. ते मला त्यातून घडवून माझ्यात आत्मविश्वास निर्माण करतात. मी शोधलेले नामजपादी उपाय योग्य असल्यास सद्गुरु काका ‘‘तुम्हाला आता सूक्ष्मातील कळायला लागले’’, असे सांगून मला प्रोत्साहन देतात.
७. साधकांच्या साधनेला दिशा देऊन त्यांच्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करवून घेणे
स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधकांचा सत्संग झाल्यावर सद्गुरु काका आम्हाला त्याविषयी जिज्ञासेने विचारून ‘कृतीच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे ?’, हेही सांगतात. एकदा त्यांनी सांगितले, ‘‘सत्संगात अंतर्मुुख होण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्यावर तुम्ही त्याकडेच लक्ष देऊन अन्य प्रयत्न सोडून देता. तुम्ही नित्य करत असलेल्या प्रयत्नांसह अंतर्मुख होण्यासाठीही प्रयत्न करायचे असतात.’’ सद्गुरु काका आम्हाला ‘व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड कशी घालायची ?’, याची दिशा देऊन त्याप्रमाणे आमच्याकडून प्रयत्नही करवून घेतात.
८. सद्गुरु डॉ. गाडगीळकाका त्यांची मुलगी सौ. सायली करंदीकर हिला त्या त्या वेळी तिच्या चुकांची जाणीव करून देतात.
९. गुरुकार्याचा ध्यास
एके दिवशी सद्गुरु काकांना वाटले, ‘उद्या स्वतःला ताप येईल’; म्हणून त्यांनी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागून स्वतःकडील प्रलंबित सेवा पूर्ण केली आणि नंतरच ते झोपले. दुसर्या दिवशी त्यांना खरोखरच ताप आला.
१०. सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य
अ. एखाद्या साधकाला आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्याविषयी सद्गुरु काकांना आधीच समजते. ते त्या साधकासाठी नामजपादी उपाय आरंभ करतात आणि नंतर त्या साधकाला त्रास होत असल्याचे कळते. यातून त्यांचे सूक्ष्मातून जाणण्याचे अफाट सामर्थ्य लक्षात येते, तसेच ‘ते त्यांच्या सेवेशी किती एकरूप झाले आहेत !’, हेही जाणवते.
आ. त्यांना स्वत:ला दुसर्या दिवशी काही त्रास होणार असल्यास आधीच जाणवते.
११. कर्तेपणा सहजतेने गुरुचरणी अर्पण करणे
सद्गुरु काका ‘एखाद्या खोलीत कुठे दाब जाणवतो ?’, हे सूक्ष्मातून जाणून सांगतात. त्यांनी ते ठिकाण पाहिलेलेही नसते. एकदा मी सद्गुरु काकांना म्हणाले, ‘‘साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्यांना नामजपादी उपाय शोधून देणे, एक वेळ सोपे आहे; मात्र तुम्ही एखादे ठिकाण न पहाताही तेथे ‘कुठे दाब आहे ?’, हे कसे सांगता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘परात्पर गुरुदेवांनी एखाद्या साधकाला एखादी सेवा दिल्यावर ते त्या साधकाला ती सेवा करण्याची क्षमताही देतात.’’
१२. चुकांविषयी संवेदनशीलता
एक दिवस सद्गुरु काकांना एका सेवेसाठी यायला उशीर झाला. तेव्हा सद्गुरु काकांनी लगेच कान पकडून क्षमा मागितली. ‘सद्गुरु काकांना चूक झाल्यावर आतून इतकी खंत वाटली’, हे पाहून मला स्वतःची लाज वाटली.
१३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका रहात असलेल्या खोलीची जाणवलेली वैशिष्ट्ये
अ. त्यांच्या खोलीचे आकारमान मोठे वाटते.
आ. सद्गुरु काकांच्या खोलीतील कोणत्याही वस्तूकडे पाहिल्यावर त्यातून चैतन्य मिळते.
इ. त्यांच्या खोलीत गेल्यावर माझे मन शांत होते आणि ‘मी वेगळ्याच विश्वात आले आहे’, असे मला वाटते.
ई. ते जो आरसा वापरतात, त्या आरशात इतके स्पष्ट दिसते की, आपल्यावर त्रासदायक आवरण असेल, तर आरशात आपला तोंडवळा पहावासा वाटत नाही आणि आपल्यावर आवरण नसेल, तर आपला तोंडवळा सुंदर दिसतो. अन्य खोल्यांमधील आरशांमध्ये असे दिसत नाही.
१४. कृतज्ञता आणि प्रार्थना
मला अशा संतरत्नांचा सहवास लाभतो. त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते. ‘देवा, आम्हा सर्वांना सद्गुरु गाडगीळकाकांचा अधिकाधिक लाभ करवून घेता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !
– कु. निकिता झरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०२०)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |