पतीचे कर्तव्य योग्य प्रकारे निभावून आदर्श पती आणि आदर्श पुत्र असणारे सनातनच्या आश्रमातील श्री. प्रकाश मराठे (वय ७७ वर्षे) !
पतीचे कर्तव्य योग्य प्रकारे निभावून आदर्श पती आणि आदर्श पुत्र असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे (वय ७७ वर्षे) !
‘मला ५० वर्षे पितृवत सांभाळणारे, माझा गृहस्थाश्रम सुखाचा करणारे आणि मला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे माझे यजमान श्री. प्रकाश मराठे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा लेख लिहीत आहे.
सौ. शालिनी मराठे यांनी लिहिलेल्या या लेखावरून श्री. प्रकाश मराठे यांचे वागणे, बोलणे साधनेत येण्यापूर्वीही आदर्श होते, तसेच सौ. मराठे यांच्याही मनाची निर्मळता आणि प्रांजळपणा लक्षात येतो. दोघांनीही ‘आदर्श पती-पत्नी कसे असावेत ?’, याचा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. दोघेही संतत्वाकडे वाटचाल करत आहेत, यात आश्चर्य ते काय ?
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. पत्नीकडून न्यूनतम अपेक्षा असणे
‘वर्ष १९७२ मध्ये आमचा विवाह झाला. विवाहानंतर काही मासांनी मी श्री. प्रकाश (पती) यांना विचारले, ‘‘तुम्ही मला पत्नी म्हणून का निवडले ? तुमच्या पत्नीविषयी काय अपेक्षा होत्या ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या फारशा अपेक्षा नव्हत्या. बायको शिकलेली हवी, म्हणजे वेळप्रसंगी ती अर्थाजन करून स्वतःच्या पायांवर उभी राहू शकेल आणि संसार चालवू शकेल. तिने माझ्या आई-वडिलांशी चांगले वागावे आणि माझ्या आई-वडिलांची सेवा करावी.’’ गुरुकृपेनेच ‘कुटुंबवत्सल आणि शिकलेली मुलगी हवी’, एवढ्या न्यूनतम अपेक्षा असलेले पती मला लाभले. पत्नीविषयी फार अपेक्षा असल्या की, त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पुढे पती-पत्नीचे पटत नाही आणि भांडणे होतात. गुरुकृपेने आमच्या संदर्भात तसे झाले नाही.
२. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात श्री. मराठे यांचा दृष्टीकोन
२ अ. काटकसरीने धनसंचय करणे : त्या काळी गोव्यात शिक्षणाची सोय नसल्यामुळे यजमानांना सांगली आणि पुणे येथे नातेवाइकांकडे राहून शिक्षण घ्यावे लागले. आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे सासरे त्यांना अधिक पैसे पाठवू शकत नव्हते. नातेवाइकांचीही परिस्थिती मध्यमच होती, तरीही त्यांनी यजमानांना प्रेमाने घरी ठेवून घेतले. तेव्हा यजमानांना नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या मनावर पैसे साठवण्याचे महत्त्व बिंबले गेले होते. त्यांनी नोकरीच्या १० वर्षांच्या कालावधीत पै पै साठवून १० सहस्र रुपये जमा केले. त्या काळी १० सहस्र रुपयांचे मूल्य पुष्कळ होते.
२ आ. पैसे बुडाले, तरी स्थिर रहाणे : अधिक व्याज मिळावे, या उद्देशाने त्यांनी १० वर्षांच्या कालावधीत साठवलेले १० सहस्र रुपये एका खासगी आस्थापनात गुंतवले. त्या वेळी माझा आणि सासूबाईंचा दृष्टीकोन पूर्ण व्यावहारिक असल्याने आम्ही दोघी त्यांची ‘खासगी आस्थापनात पैसे गुंतवू नयेत’, यासाठी सतत कानउघाडणी करत असू. वर्ष १९७५ मध्ये ते आस्थापन डबघाईला आले आणि आमचे पैसे बुडाले. ‘इतके कष्टाने त्यांनी साठवलेले पैसे बुडाले किंवा आम्ही त्यांना इतके बोलायचो’, याचे त्यांना काहीच वाटत नसे. पुढे साधनेत आल्यावर ‘सगळे प्रारब्धानुसार आणि देवाण-घेवाण हिशोबानुसार घडते’, हे माझ्या लक्षात आले. आता ‘त्या काळात आम्ही त्यांना फारच त्रास दिला’, असे मला वाटते. त्यासाठी मी यांची क्षमा मागते.
२ इ. मिळकतीतील काही भाग सत्कार्य आणि धर्मकार्य यांसाठी व्यय करणे : यजमानांना वेतन मिळाले की, ते पैसे देवापुढे ठेवून त्यांतील काही पैसे आम्ही देवाला अर्पण करत असू. तेव्हा देवाला ‘आमचे कष्टाने मिळवलेले पैसे सत्कार्य आणि धर्मकार्य यांसाठी व्यय होऊ देत’, अशी आपोआपच प्रार्थना होऊ लागली. त्यानंतरही हे पैसे काटकसरीनेच वापरून साठवत राहिले. पुढे आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. देवाने आम्हाला साक्षात् वैकुंठलोक असलेल्या रामनाथी आश्रमात ठेवून आमची संपूर्ण काळजीच घेतली. त्याबद्दल गुरुदेवा, आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
३. पत्नीला गुण-दोषांसह स्वीकारणे
आम्हा दोघांची आवड-नावड आणि स्वभाव भिन्न असूनही ते एकमेकांना पूरक ठरले, ही गुरुकृपाच आहे. यजमानांचे रहाणे व्यवस्थित असते, तर मी अव्यवस्थित आहे. ते काटकसरी आहेत, तर मला पैसे व्यय करायला, वस्तू विकत आणायला आणि खरेदी करायला आवडायचे. मनासारखे झाले नाही की, माझी चिडचिड व्हायची किंवा मी अकारण रागवायचे; पण यजमानांनी मला माझ्या सर्व गुण-दोषांसह स्वीकारले. मी रागावल्यावर ते म्हणायचे, ‘‘तुझ्या पत्रिकेतच तुझे ‘अनावश्यक बोलणारी आणि अकारण रागावणारी’, असे वर्णन आहे. ते तंतोतंत खरे आहे.’’
४. ‘अपत्य नसले, तरीही चालेल’, या यजमानांच्या ठाम निर्णयामुळे परित्यक्तेचे (पतीने टाकलेली) जीवन जगावे न लागणे
आम्हाला ‘अपत्य नसणे’, हे आमचे संसारातील सर्वांत मोठे दुःख होते; पण मला यजमानांची साथ मिळाल्यामुळे ते सुसह्य झाले. अपत्य नसणार्या स्त्रीचे नातेवाईक असोत कि शेजारी, सारेच तिची अवहेलना करतात. काही जवळच्या नातेवाइकांनी त्यांना दुसरा विवाह करायला सांगितला. माझे सासरे चांगले होते. त्यांनी ‘मूल दत्तक घेऊ शकता’, असा पर्याय सुचवला. श्री. मराठे यांच्या ‘मूल नसले, तरीही चालेल’ या ठाम निर्णयामुळे मला परित्यक्तेचे (पतीने टाकलेली) जीवन जगावे लागले नाही. माझे भाग्य थोर म्हणून मी हिंदु धर्मात जन्माला आले आणि मला सुसंस्कृत अन् सुस्वभावी यजमान लाभले.
५. पतीचे कर्तव्य निभावणे
५ अ. कुठलाही हक्क न बजावता अर्धांगिनीप्रमाणे वागणे : यजमान मला सणवार, वाढदिवस, नातेवाइकांची लग्नकार्ये या निमित्ताने वर्षाला ३ – ४ चांगल्या साड्या घ्यायचे. आमच्या ५ दशकांच्या सहजीवनात त्यांनी मला ज्या ज्या गोष्टी देता येतील, त्या सर्व प्रेमाने दिल्या. त्यांनी माझ्यावर कधी पती म्हणून हक्क न बजावता मला कशाचीच न्यूनता भासू दिली नाही. मी आश्रमात रहात आहे, तर ‘इथे सर्व मिळते’, असा विचार न करता ते मला लागणारी औषधे, फळे आणि अन्य गोष्टी वेळोवेळी आणून देतात. त्यांनी बाहेरून खाऊ आणला किंवा आश्रमात त्यांना कुणी खाऊ दिला, तर त्यातील अर्धा खाऊ ते मला देतात. मी ‘नको’, म्हणाले, तरीही ते मला सांगतात, ‘‘आता ठेव. नंतर तुला हवा असेल, तेव्हा खा.’’ साधारणपणे एखाद्याला थोडासा खाऊ मिळाला, तर तो स्वतःच खाण्याची वृत्ती असते; मात्र माझे यजमान अगदी छोटासा तुकडा असला, तरी तो सांभाळून मला देतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मलाही असे करणे इतक्या वर्षांत जमले नाही.
गुरुपौर्णिमेनिमित्त ते जेवढी रक्कम स्वतःच्या नावे अर्पण करतात, तेवढीच रक्कम ते माझ्या नावेही अर्पण करतात.
५ आ. पत्नीसाठी सर्व कर्तव्य म्हणून निरपेक्षपणे करणे : ‘इतके ते माझ्यासाठी करतात, तर ते माझ्यात अडकले आहेत’, असेही नाही. ‘माझी काळजी घेणे’, हे ते त्यांचे दायित्व समजतात. आम्ही दोघेही शिकलेलो आहोत आणि आर्थिकदृष्ट्याही एकमेकांवर अवलंबून नाही, तरीही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांनुसार हिंदु धर्मात पतीला पत्नीच्या संदर्भात जे सांगण्यात आले आहे, त्यानुसार ‘पत्नीचे दायित्व माझ्यावर आहे’, असे त्यांना वाटते. सध्याच्या युगातील पती-पत्नींचे वागणे पहाता किंवा पत्नी अपेक्षेप्रमाणे न वागल्यास पतीचे वागणे पाहिल्यास मला हे विशेष वाटते आणि ‘हिंदु धर्मातील जुन्या विचारांचा पगडा आदर्श जीवन जगायला कसा शिकवतो ?’, हे मनावर बिंबते.
५ इ. योग्य निर्णय घेऊन पत्नी आणि आई यांची मनोभावे सेवा करणे : वर्ष २००५ मध्ये माझ्या सासूबाई अंथरुणाला खिळून होत्या. त्या वेळी मला कावीळ झाल्याने मी अत्यवस्थ होते. तेव्हा यजमानांनी मला बांबोळी येथील रुग्णालयात भरती करायचे ठरवले. तेवढ्यात माझ्या भावाचा भ्रमणभाष आला. त्याने माझ्या आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अशा स्थितीत यजमानांनी त्यांच्या आईच्या सोबतीला एका शेजार्याला ठेवले आणि मला सिंधुदुर्गमध्ये असलेल्या माझ्या माहेरी नेऊन आईचे अंत्यदर्शन घडवले. त्या वेळी यजमानांनी योग्य निर्णय घेतला; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी यजमानांनी १५ दिवस आम्हा दोघींची मनोभावे सेवा केली. तेव्हा ‘ते सेवा करत नसून देवच आमची सेवा करत आहे’, असे आम्ही अनुभवले. यजमानांच्या निरपेक्ष प्रेमामुळेच आमचा संसार गोड झाला.
६. मृत्यूला सामोरे जाण्यासाठी मनाची सिद्धता करून घेणे
वर्ष २०१५ मध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्यात पुढील संभाषण झाले.
यजमान : तुझ्या वाढदिवसानिमित्त आज आपण एक ध्वनीचित्र चकती पाहूया. (ती ध्वनीचित्रचकती ‘मृत्यू आणि मृत्यूनंतर’ याविषयी होती. (त्यानंतर २ दिवसांनी) ‘माझा मृत्यू होऊ शकतो’, याचा विचार तू कधी केला आहेस का ?
मी : माझ्या मनात कुणाच्या मृत्यूचा कधी विचारच आला नाही.
यजमान : आपण गुरूंच्या छत्राखाली सनातन परिवारात आहोत, हे महद्भाग्य आहे. त्यामुळे मला तुझी किंवा तुला माझी काळजी वाटू नये. आतापर्यंत तुझे सर्व व्यवहार मी सांभाळले. तुला अधिकोषातील व्यवहार जमत नाहीत. तू ते कधी शिकूनही घेतले नाहीस. तू इथे आश्रमात असल्यामुळे माझ्या नंतर साधक तुला सर्वतोपरी साहाय्य करतील. मला कसलीच काळजी नाही, तरीही आपण आता मृत्यूचा विचार करून हळूहळू सिद्धता करायला हवी ना !
या प्रसंगानंतर ‘हे माझा किती विचार करतात’, असे वाटून मला गहिवरून आले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७. यजमानांनी स्वभावदोष दाखवून साधनेत साहाय्य करणे
वर्ष २०१८ मध्ये एकदा मी यजमानांना म्हणाले, ‘‘या आठवड्यात मला माझ्या स्वभावदोषांवर नवीन स्वयंसूचना सिद्ध करायच्या आहेत. ‘मी कोणते स्वभावदोष निवडू ?’, ते मला सांगा. तुम्हाला माझे सर्व स्वभावदोष ठाऊक आहेत.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अलीकडे मला तुझ्यात स्वभावदोषच दिसत नाहीत.’’ हे वाक्य ऐकून माझे मन सुखावले. त्यानंतर आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
श्री. मराठे : मी एका साधकाला मेथीची पावडर आणायला सांगितली आहे.
मी : मेथीने मला पित्त होते. त्यामुळे मी ती घेणार नाही. ‘मेथीने पित्त होते कि नाही’, हे वैद्यांना ठाऊक असते. वैद्य मेघराजला (वैद्य मेघराज पराडकर यांना) विचारा, म्हणजे कळेल. (माझे स्वभावदोष : ऐकण्याची वृत्ती नसणे, स्पष्टीकरण देणे, शिकवण्याची भूमिका असणे)
श्री. मराठे : तरीही एक आठवडा घेऊन पाहू शकतेस !
मी : मी तुम्हाला ‘मेथी घेतली’, असे सांगितले आणि प्रत्यक्षात घेतली नाही तर !
(माझा स्वभावदोष ः खोटे बोलणे, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे, स्वेच्छेने वागणे)
श्री. मराठे : मी तुला मधुमेह आहे; म्हणून सांगत नाही. ‘मलाही फार थकवा असतो, तर थोडीशी साखर घालून दुधासह आपण दोघेही मेथी घेऊ शकतो का ?’, असे मला विचारायचे होते; पण तू ऐकतेस कुठे ? बघ तुझ्यात किती स्वभावदोष आहेत ? हे वर्षभर स्वयंसूचना घ्यायला पुरेसे आहेत ना ?
त्या वेळी ‘माझ्यातील अशा अनेक स्वभावदोषांमुळे मी यजमानांना किती त्रास दिला’, या विचाराने मला फारच खंत वाटली. मला त्यांनी केवळ संसारातच नव्हे, तर साधनेतही वेळोवेळी साहाय्य केले. गुरुदेवांनी अशा प्रकारे साधक यजमानांच्या माध्यमातून माझी काळजी घेतली. त्याबद्दल मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
‘गुरुदेवा, तुमच्या कृपेने आमचा सात पावलांचा हा प्रवास तुमच्या चरणी विलीन होऊनच पूर्ण होऊ दे’, अशी मी प्रार्थना करते.’
– सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०२०)