हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !
‘सनातन प्रभात’ म्हणजे सामान्य नियतकालिक नव्हे, तर प्रतिदिन प्रकाशित होणारा अद्वितीय ग्रंथच !
‘हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे’ हे दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साध्य होते ! – भारताचार्य सु.ग. शेवडे
सनातन संस्थेने मागील २२ वर्षे अत्यंत काळजीपूर्वक आणि नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित करण्याचे उत्तम कार्य केले आहे. विशेषत: आपले सिद्धांत आणि विचार यांना कायम राखून त्यानुसारच सर्व लेखन या अंकात केले जाते. हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आणि त्यांच्यात धर्माविषयी आस्था निर्माण होणे अन् ती टिकून रहाणे, ही महत्त्वाची गोष्ट दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साध्य होते. ‘हे कार्य असेच चालू रहावे आणि त्यातून साध्य हेतू सिद्ध व्हावा’, यासाठी शुभेच्छा !
कित्येकदा कथित मुख्य धारेतील वृत्तपत्रांतून न कळणारी वृत्ते दैनिक ‘सनातन प्रभात’मधून समजतात ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि लेखक
‘अत्यंत स्पष्ट आणि निर्भिडपणे बातम्या देणारे वृत्तपत्र’ म्हणून आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’कडे बघतो. काही वेळेला काही जण दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी ‘भडक किंवा खोट्या बातम्या देत असावेत’, अशी शंका व्यक्त करतात. ‘असे असते, तर वृत्तपत्राची मान्यता रहित झाली नसती का ?’ असा प्रतिप्रश्न विचारला की, ते गप्प बसतात. कित्येकदा कथित मुख्य धारेतील वृत्तपत्रांतून कळत नाहीत, अशा बातम्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून समजतात. एखादी चूक झाली, तर ती सार्वजनिकरित्या मान्य करण्याचा मोठेपणा याच एका वर्तमानपत्रातून दिसतो.
अनेक धमक्या येऊनही दैनिक ‘सनातन प्रभात’चे सत्य सांगण्याचे धोरण स्तुत्य ! – श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई
‘सनातन’ म्हणजे पूर्वीपार चालत आलेले अपरिवर्तनीय सत्य ! जोपर्यंत हिंदु समाज हे जाणून होता, तोपर्यंत अनेक आक्रमणे होऊनही हिंदूंनी विजय मिळवला. कालौघात आपण सनातन परंपरा सोडली. त्यामुळे गुलामीच्या विळख्यात अडकलो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंची जागृती आणि संघटन यांसाठी अपार कार्य केले; पण काँग्रेसच्या मायावी विळख्यात अडकलेल्या हिंदु समाजाने त्यांच्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. परिणामत: भारताची फाळणी झाली. आज देश पुन्हा एकदा अशाच परिस्थितीत उभा आहे. खरेतर वर्ष १९४७ च्या फाळणीनंतर लाखो हिंदूंच्या हत्या आणि स्त्रियांचे सामूहिक बलात्कारकांड झाले. यानंतर जर हिंदू जागृत झाले असते, तर आज ही परिस्थिती नसती. या स्थितीतही दैनिक ‘सनातन प्रभात’ मागील २२ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि हिंदूंची सद्यस्थिती यांविषयी असंख्य धमक्या येत असतांनाही सत्य सांगण्याचे जे धोरण राबबत आहे, ते अत्यंत स्तुत्य आहे. यातून हिंदु जनजागृती समितीसारख्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा जन्म झाला. त्या हिंदूंच्या हितासाठी ठामपणे लढत आहेत. हिंदूंसाठी कार्य करणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’ला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. पुढील काळात सर्व राष्ट्रवादी हिंदू या कार्यात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मागे ठामपणे उभे राहोत, ही शुभेच्छा !
‘समाजात घडणार्या अप्रिय घटनांविषयी आवाज उठवणारे दैनिक’ म्हणून ‘सनातन प्रभात’चेच नाव वाचकांच्या ओठी ! – श्री. दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते
दैनिक ‘सनातन प्रभात’ राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांना वाहिलेले आहे. यामध्ये येणारी वृत्ते अन्य वृत्तपत्रांत वाचायला मिळत नाहीत. वाचकांना सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टी देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. न्यायालयीन निवाड्यांविषयीची सविस्तर माहिती दैनिकातून मिळते. त्यामुळे कायद्याचे प्राथमिक ज्ञान सहज मिळते. ‘समाजात घडणार्या अप्रिय घटनांविषयी आवाज उठवणारे दैनिक’ म्हणून ‘सनातन प्रभात’ हेच नाव वाचकांच्या ओठावर येते. जागृती करणारे, राष्ट्रीय भावना निर्माण करणारे आणि संस्कृतीनिष्ठा वाढवणारे हे दैनिक दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. याची प्रचीती वर्षानुवर्षे येत आहे.
उत्तम आणि ‘ओरिजिनल कन्टेंट’ देण्यात ‘सनातन प्रभात’चा हातखंडा ! – श्री. उन्मेश गुजराथी, संपादक, दैनिक ‘स्प्राऊंट्स’
कुठल्याही वृत्तपत्राचा गाभा हा त्याच्या लिखाणातील सामग्रीमध्ये (‘कन्टेंट’मध्ये) सामावलेला असतो. आजच्या माहितीजालाच्या जगात माहितीचा प्रस्फोट होत आहे. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे आदी ठिकाणी ‘कॉपी’ अन् ‘पेस्ट’ (मजकुराची नक्कल करणे) ही विकृती बळावत आहे; मात्र मी ठामपणे सांगू इच्छितो की, ‘सनातन प्रभात’ त्याला अपवाद आहे. उत्तम आणि मूळ सामग्री (‘ओरिजिनल कटेन्ट’) देण्यात ‘सनातन प्रभात’चा हातखंडा आहे. दैनिकातील संपादकीयमध्ये वैचारिक प्रगल्भता दिसून येते, जी तुलनेत अन्य कोणत्याही वृत्तपत्रात सध्यातरी दिसून येत नाही. अगदी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ यांसारखी वृत्तपत्रेही सध्या ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ (पी.टी.आय्.), ‘एशियन न्यूज इंटरनॅशनल’ (ए.एन्.आय्.) यांसारख्या वृत्तसंस्थांवर अवलंबून असतात. त्यांना स्वत:ची दिशा आणि वैचारिक अस्तित्व नाही. अशा वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सामग्री (कन्टेंट) उत्तम आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी असते. आजही ‘गुगल’ या ‘सर्च इंजिन’ला उत्तम आणि मूळ सामग्रीची प्रचंड आवश्यकता असते. अशा वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’ कुठलेही तांत्रिक आणि महागडे ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’ (SEO) न वापरता वरच्या स्थानावर आहे. हे या दैनिकातील उत्तम आणि मूळ सामग्रीचे यश आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ हे हिंदुत्वाची बाजू परखड मांडणारे वृत्तपत्र ! – आमदार श्री. भरतशेठ गोगावले, शिवसेना
मागील अनेक वर्षांपासून मी सनातन संस्था आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे कार्य जवळून पहात आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाची बाजू नेहमीच परखडपणे मांडली जाते. जे चांगले कार्य आहे, त्याची प्रशंसा आम्ही नेहमीच करतो. आमच्या हिंदुत्वाच्या कार्याला ‘सनातन प्रभात’मधून नेहमीच प्रसिद्धी दिली जाते.