एस्.टी.कर्मचार्यांच्या संपावरून अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ !
अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार भूमिका मांडेल ! – अनिल परब, परिवहनमंत्री
मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – राज्यात गेल्या ४ मासांपासून चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाविषयी राज्य सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा. आजचे सभागृहाचे कामकाम बाजूला ठेवून याविषयी चर्चा करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रतोद आमदार (विधानसभेतील पक्षप्रमुख असलेले आमदार) तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी २२ मार्च या दिवशी विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे केली; मात्र ही मागणी तालिका अध्यक्षांनी फेटाळली. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. याविषयी परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करून भूमिका मांडू’, असे सांगितले.
आमदार आशिष शेलार म्हणाले की, गेल्या ४ मासांत संपामुळे आतापर्यंत १०० एस्.टी. कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचसमवेत या प्रश्नावर न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. न्यायालयाच्या दिनांकावर दिनांक पडत आहेत; मात्र निर्णय होत नाही. एस्.टी. कर्मचारी वेठबिगारी (मजुरीचे काम करून) आणि ट्रक चालवून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाविषयी राज्य सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा. एस्.टी. बंद असल्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेचे अतोनात हाल होत आहेत, तसेच सध्या परीक्षा चालू झाल्या असून विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोचणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार एस्.टी. कर्मचार्यांना धमकी देऊन ‘आम्ही तुम्हाला कामावरून अल्प करू. दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी भरू’, असे म्हणत आहे.