पुणे येथे (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या १०० व्या ‘ई-बूक’चा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

(निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक

पुणे – (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आधारित ‘ई-बूक्स’ प्रसिद्ध केली असून आतापर्यंत ९९ ‘ई-बूक्स’ प्रकाशित केली आहेत. २० मार्च या दिवशी त्यांनी मेधा दिवेकर लिखित नाडी ग्रंथ ‘भविष्य गुजराथी भाषा’ या १०० व्या ‘ई-बूक’चे लोकार्पण एरंडवणा येथील मनोहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले. या प्रसंगी (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले, (निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, रमल विद्या तज्ञ श्री. चंद्रकांत दादा शेवाळे आणि श्री. भारवि अवधानी हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

(निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांनी १ ते १०० ‘ई-बूक्स’ची माहिती ‘पॉवरपॉईंट’च्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. ‘ज्यांना कुणाला हे ग्रंथ हवे असतील त्यांना ते अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्यात येतील’, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा ओक-प्रधान यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ. वरदा ओक यांनी केले. (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि पूज्य चितळे बाबा काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. भोज येथून श्री. अद्वयानंद गळतगे यांनीही हस्तलिखित संदेश पाठवला. सर्व संदेशांचे वाचन मेधा गोखले यांनी केले.

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलेली मनोगते

(डावीकडून) (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले, (निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, रमल विद्या तज्ञ श्री. चंद्रकांत दादा शेवाळे, श्री. भारवि अवधानी

‘ई-बूक’मध्ये प्रत्येक विषय वैशिष्ट्यपूर्ण दाखवला आहे ! – (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले

‘ई-बूक’ करण्याचा ध्यास ठेवून विंग कमांडर शशिकांत ओक यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांना त्यात यश आले आहे. चांगला उपक्रम चालू केला असून त्यांनी प्रत्येक विषय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांच्या बारकाव्यांनिशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्म आणि राष्ट्र टिकवण्यासाठी प्रत्येकाने लढायला हवे ! – (निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर

(निवृत्त) लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर

विंग कमांडर शशिकांत ओक यांचे हे कार्य अतिशय सुंदर आहे. त्यांनी हे पुढेही असेच चालू ठेवावे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून त्या काळी काय घडले, याची कल्पना आली असेल. प्रत्यक्षात या चित्रपटात एक दशांश दाहक भागही दाखवलेले नाहीत. याहीपेक्षा भयावह परिस्थिती त्या वेळी होती. मी त्याकाळात त्या ठिकाणी प्रत्यक्ष लढलो आणि आतंकवाद्यांना मारले आहे. लढाई ही कधीही ‘आउट सोर्सिंग’ (भाडोत्री सेनेने) होत नाही. राष्ट्र आणि धर्म टिकवायचे असेल तर प्रत्येकाने लढायला हवे.

विंग कमांडर ओक प्रथितयश साहित्यिकच आहेत ! – रमल विद्यातज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे

विंग कमांडर शशिकांत ओक यांनी सामाजिक दायित्व सांभाळत, हे काम केले आहे. ग्रहांकित मासिकात प्रतिवर्षी ते विविध विषयांवर लिखाण करतात. त्यांनीच आम्हाला नाडी ग्रंथ/ज्योतिष यांविषयी माहिती दिली. ते एक प्रतिथयश साहित्यिकच आहेत, असे म्हणावे लागेल.

१०० व्या ‘ई-बूक’चे लोकार्पण हा एक चमत्कार आहे ! – भारवि अवधानी

भारवि अवधानी (मध्यभागी)

श्री. भारवि अवधानी यांनी आपल्या नाडी ज्योतिषविषयी अनुभव सांगितले. महर्षींनी त्यांना आशीर्वाद दिला आहे. नाडी भविष्य हा एक चमत्कारच आहे. त्याचप्रमाणे १०० व्या ‘ई-बूक’चे लोकार्पण हापण एक चमत्कार आहे. हे सर्व करतांना शशिकांत ओक यांना त्रासही सहन करावा लागला आहे, तरीही त्यांनी हे कार्य चालू ठेवले आहे. त्यांचे कार्य या पुढेही असेच चालू राहिले पाहिजे. त्यांना जे काही सहकार्य आवश्यक असेल, ते आम्ही करू.

क्षणचित्रे 

१. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी (निवृत्त) विंग कमांडर शशिकांत ओक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.

२. अत्यंत साध्या पद्धतीत आणि अतिशय उत्साही वातावरणात सोहळा साजरा झाला.

३. ‘शशिकांत ओक यांनी घेतलेले कष्ट, आश्चर्यकारक अनुभव आणि त्यांची सत्य शोधण्याची धडपड या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत’, अशा शब्दांत सर्वांनी त्यांचे कौतुक केले.