श्रीकृष्णस्वरूपाचे ध्यान करत परमानंदात निमग्न होणारे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज !
२३.३.२०२२ या दिवशी असलेल्या एकनाथषष्ठीच्या निमित्ताने…
१. जन्म
श्री एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे झाला. जन्मकाळी त्यांचे मूळ नक्षत्र होते. त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांत त्यांच्या माता-पित्यांचे निधन झाल्याने त्यांचे संगोपन त्यांच्या आजी-आजोबांनी केले. आजी त्यांना ‘एक्या’ या नावाने संबोधत असे. जन्मतःच त्यांना श्रद्धा आणि मेधा (कुशाग्र बुद्धीमत्ता) प्राप्त झाल्या होत्या.
२. लहानपणापासून देवाची आवड असणे
लहानपणापासून त्यांना ‘स्नान-संध्या, हरिभजन, पुराणश्रवण आणि देवीदेवतांची पूजा करणे’, यांची आवड होती. नाथांना त्यांच्या मुंजीनंतर ‘वैश्वदेव, रुद्र आणि पवमान सूक्त’, हे सर्व मुखोद्गत झाले.
३. गुरुभेट आणि अनुग्रह
त्यांचे चरित्र बालपणापासूनच असामान्य कोटीतील होते. एकदा रात्री ते शिवालयात (शिवमंदिरात) हरीचे गुणगान गात असतांना देवगडावरील जनार्दनस्वामी यांच्याकडे जाण्याची आकाशवाणी झाली. तेव्हा नाथ घराची आठवण न ठेवता जनार्दनस्वामींच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला. ‘मनोभावे गुरुसेवा करणे’, हीच परमेश्वराची सेवा मानून ६ वर्षे सेवा केल्यानंतर नाथांना अनुग्रह मिळाला. दत्तात्रयाचे दर्शन घडल्याने नाथांना परमानंद झाला.
४. साधना
ते शूलभंजन पर्वतावर कर्तव्याचा बोध होण्यासाठी, तसेच श्रीकृष्णाची उपासना आणि अनुष्ठान करण्यासाठी गेले. त्यांना काही दिवसांतच भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडले. ते तीर्थयात्रा करत असतांना त्यांना आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांचेही दर्शन घडले.
५. समाधी
ते तीर्थयात्रा करून पैठणला परतले. त्यानंतर त्यांनी सर्व आयुष्य परोपकार करण्यात व्यतीत केले. त्यांनी ‘एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, चतुःश्लोकी भागवत’ इत्यादी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ते श्रीकृष्णस्वरूपाचे ध्यान करत परमानंदात निमग्न होऊन पैठण येथेच समाधीस्त झाले.
अशा संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांना माझे शतशः वंदन !
– श्री. गीतेश शिंदे
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, मे २००३)