खरसॉन शहरात रशियन सैन्याने निःशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केल्याचा युक्रेनचा आरोप

घटनास्थळ

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनसमवेतच्या युद्धाच्या २७ व्या दिवशी युक्रेनच्या खरसॉन शहरात आंदोलन करणार्‍या निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत गोळीबाराच्या वेळी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळापळ करतांना दिसत आहेत. दुसरीकडे युक्रेनची राजधानी कीवमधील एका व्यापारी संकुलावर रशियन सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात अनुमाने ८ जणांचा मृत्यू झाला.

रशियाला युक्रेन नागरिकांकडून मोठा विरोध केला जात आहे. समोर आलेल्या अन्य एका व्हिडिओत खरसॉन भागात रशियन सैन्यासमोर स्थानिक नागरिक गोळा होऊन घोषणाबाजी करतांना दिसून येत आहेत. समोरून येत असलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे भेदरलेले रशियन सैन्य त्यांच्या गाड्या मागे हटवतांनाही या व्हिडिओत दिसत आहेत.