नम्र, प्रेमळ आणि सतत हसतमुख असलेल्या कल्याण, जिल्हा ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अर्चना अर्गेकर (वय ६३ वर्षे) !
१. सौ. अनिता शहाणे, कांदिवली
१ अ. नम्र आणि हसतमुख : सौ. अर्चना अर्गेकर नेहमी हसतमुख असतात आणि नम्रतेने बोलतात. त्यांच्या तोंडवळ्यावर कधी कुठल्याही गोष्टींचा ताण जाणवत नाही. ‘सर्वकाही देवच करून घेणार आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते.
२. सौ. मंगला राऊत, मीरारोड
२ अ. आध्यात्मिक मैत्रीण : अर्चनाताई प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत. पूर्वी मला घरातून बाहेर जाऊन सेवा करायला पुष्कळ विरोध होता. त्यामुळे कधी कधी माझे आणि यजमानांचे पुष्कळ भांडण होऊन माझ्या मनाचा मोठा संघर्ष व्हायचा. त्या वेळी अर्चनाताईंना सर्वकाही मनमोकळेपणाने सांगून मी त्यांचे साहाय्य घेत असे. त्या मला प्रेमाने समजावत, ‘‘तुमचा देवाण-घेवाण हिशोब असेपर्यंत तुम्हाला त्रास होणार आहे. प्रारब्ध संपले की, सर्व त्रास न्यून होतील आणि परात्पर गुरु डॉक्टरच तुम्हाला यातून बाहेर काढतील.’’ त्यांनी असे सांगितल्यावर मी शांत आणि स्थिर होत असे. अर्चनाताई मला आध्यात्मिक मैत्रीण म्हणून लाभल्या, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ‘त्यांची साधनेत उत्तरोत्तर प्रगती होत राहो’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.
३. सौ. दीक्षा पेंडभाजे, टिटवाळा
३ अ. शेजारी रहाणार्या दांपत्याला मूलबाळ नसल्याने स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे कायमचे ठेवून मातृवात्सल्यापेक्षा शेजारधर्म अधिक पाळणार्या अर्गेकरकाकू ! : अर्गेकरकाकू पूर्वी कल्याणला रहायच्या. त्यांच्या शेजारी रहाणार्या दांपत्याला मूलबाळ नसल्याने त्यांना काकूंच्या मुलाचा लळा लागला. नंतर कल्याण सोडून विरारला जातांना अर्गेकरकाकूंनी स्वतःच्या मुलाला त्या दांपत्याकडे राहू दिले. त्यांनी मातृत्वाचा त्याग करून शेजारच्यांचा विचार केला आणि अगदी निश्चिंतपणे विरारला रहायला गेल्या. त्या वेळी ‘आता सेवेला अधिक वेळ देता येईल’, असाही त्यांचा विचार होता. त्यांचा मुलगा जरी त्यांच्यासमवेत राहिला नाही, तरी त्याच्यातही अर्गेकर काकूंसारखेच गुण आहेत. काकूंनी आता कल्याणमध्ये घर घेतले असून काही मासांपूर्वी त्या परत कल्याणला रहायला आल्या आहेत; पण तरी त्यांचा मुलगा त्या शेजारच्या काकूंकडेच रहातो. आर्गेकर काका आणि काकू यांनी मुलाला ‘तू आता आमच्याकडे ये’, असे कधीच म्हटले नाही. यातून त्या ‘शेजारच्यांचा विचार अधिक करतात’, हे मला शिकायला मिळाले.
३ आ. ‘स्वतःचे घर म्हणजे श्री गुरूंचीच वास्तू आहे’, असा भाव असल्याने घराचा गुरुकार्यासाठी वापर व्हावा, अशी इच्छा व्यक्त करणे : कल्याणला रहायला आल्यावर पहिल्या भेटीतच त्यांनी मला सांगितले, ‘‘ताई, हे घर म्हणजे श्री गुरूंचीच वास्तू आहे. त्यामुळे येथे साधक आणि संत यांचे रहाण्याचे नियोजन करू शकतो, तसेच येथे सत्संगही घेऊ शकतो.’’ काकूंनी असे स्वतःहून सांगितल्याने अशा सेवा आल्यास माझ्यासमोर प्रथम काकूंचेच नाव येते आणि काकूही पुष्कळ भावपूर्णपणे आणि आनंदाने सर्व सेवा करतात. (मे २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |