दुधाला किमान आधारभूत मूल्याचा निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येईल ! – सुनील केदार, दुग्धविकासमंत्री

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – दुधाला किमान आधारभूत मूल्य मिळावे, यासाठी २ बैठका झाल्या. दुग्ध व्यवसाय जिवंत राहिला पाहिजे. यासाठी शेतकर्‍यांना दुधाचे किमान आधारभूत मूल्य मिळायला हवे. मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करून याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर मंत्र्यांनी उत्तर दिले.

या वेळी सुनील केदार म्हणाले, ‘‘राज्यातील दुग्ध व्यवसायापैकी ६० टक्के दुग्ध व्यवसाय खासगी, तर ३५ टक्के सहकार क्षेत्राकडे आहे. उर्वरित केवळ ५ टक्के दुग्ध व्यवसाय शेतकरी करतात. कोरोनाच्या काळात अतिरिक्त दुधाची भुकटी करण्यात आली. यांसह दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढवण्यासाठीही शासन प्रयत्न करणार आहे.’’