राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता दक्षिण भारतातील मुसलमानांवर लक्ष केंद्रित करणार !
बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता दक्षिण भारतातील मुसलमानांना आपल्याशी जोडण्यासाठी योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. दक्षिण भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वाढत्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी संघाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण भारतात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रसार वाढवणे हे एक उद्दिष्ट असणार आहे. संघ दक्षिण भारतातील अशा मुसलमानांपर्यंत पोचणार आहे, ज्यांचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध नाही किंवा त्यांना संघटना आवडत नाही.
२. एका इंग्रजी दैनिकाला संघाच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीमध्ये त्याने सांगितले की, संघाच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, सर्व मुसलमान पीएफ्आयच्या विचारसरणीशी संबंधित नाहीत. त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने पीएफ्आयची अतिरेकी सक्रियता आवडत नाही आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. सरकारने पीएफ्आयवर बंदी घालावी, असे संघातील बहुतांश लोकांचे मत आहे.
३. या नेत्याने पुढे सांगितले की, आमची कर्नाटकात पुष्कळ चांगली संपर्क यंत्रणा आहे. तेलंगाणातही आम्ही चांगले काम करत आहोत. आम्ही केरळमध्ये लढत आहोत; पण पीएफ्आयवर डाव्यांचे वर्चस्व कायम आहे. आंध्रमध्ये किनारी भागात काम करावे लागते. आम्हाला तमिळनाडूमध्येही आमचा प्रभाव वाढवायचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देशभरात ३३ लाखांहून अधिक सदस्य आहेत.