भाजपच्या सत्ताकाळात राबवलेल्या ‘प्रज्ज्वला’ योजनेची महाविकास आघाडी करणार चौकशी !
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – भाजप शासनाच्या काळात तत्कालीन महिला आयोगाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी मंत्रीमंडळाची अनुमती न घेता निधीचा व्यय करण्यात आला, असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणी या योजनेच्या अंतर्गत राबवण्यात आलेले कार्यक्रम, तसेच व्यय यांची चौकशी करण्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. यासाठी चौकशी समिती स्थापन करून एका वर्षात अहवाल सादर करू. आवश्यकता असल्यास आयोगाच्या माजी अध्यक्षांचीही चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा ठाकूर यांनी केली.
शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी या योजनेत अपहार झाल्याची लक्षवेधी २१ मार्च या दिवशी विधान परिषदेत उपस्थित केली होती. त्यावर ठाकूर यांनी उत्तर दिले. ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी करण्यात आलेल्या व्ययाची कच्ची देयके जोडण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत २८८ पैकी केवळ ९८ मतदारसंघांत कार्यक्रम राबवण्यात आले. राजकीय प्रचारासाठी ही योजना राबवण्यात आली, असा आरोप आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केला. ‘कॅग’च्या अहवालाचा दाखला देत या योजनेची चौकशी करण्याची मागणी डॉ. कायंदे यांनी केली.
यावर उत्तर देतांना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वर्ष २०१९-२० मध्ये ‘प्रज्ज्वला’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही योजना राबवतांना शासनाच्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही. मंत्रीमंडळाच्या अनुमतीने ही योजना राबवणे आवश्यक होते. केवळ आयोगाच्या अंतर्गत अनुमतीने ही योजना राबवण्यात आली.
महिलांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या ६ विभागांमध्ये महिला आयोग आणि महिला अन् बालविकास विभागाची कार्यालये उभारण्यात येतील, असेही सौ. ठाकूर यांनी या वेळी सांगितले.