चौथी लाट !
देशात कोरोना महामारीची तिसरी लाट आता ओसरली असून आता चौथी लाट येण्याची चर्चा चालू झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. ५ सहस्रांहून अधिक लोकांना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग होऊन त्यात दोघांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे चीनच्या काही प्रांतांमध्ये निर्बंधही घालण्यात आले आहेत. हाँगकाँगमध्येही मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही संसर्ग होण्याची शक्यता गृहित धरून केंद्र सरकार सतर्क झाले आहे.
या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेऊन राज्यांना सूचनाही केल्या आहेत. असे असले, तरी चौथी लाट कोरोनाच्या ज्या प्रकारामुळे येणार आहे, तो तितका घातक नसल्याचेही तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तिसर्या लाटेमध्ये कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ या प्रकाराचा उपप्रकार असणारा ‘बीए २’ हा प्रकार चौथ्या लाटेमध्ये आहे, असे चीनमध्ये दिसून आले आहे; मात्र हा घातक नाही. त्यामुळे ‘भविष्यात भारतात चौथी लाट आली, तरी तिचा परिणाम अधिक नसेल’, असेच म्हटले जात आहे. तरीही आतापर्यंत जी सावधगिरी बाळगण्यात आली, तीच कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. उदा. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुणे आदी; मात्र सध्या देशातील नागरिकांचे वागणे पहाता या गोष्टी मागे पडत असल्याचे दिसत आहे. नागरिक ‘कोरोनाचा अंत झाला’, असे गृहित धरून वागत आहेत. यात त्यांची काही चूक आहे, असेही नाही; कारण जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे, ‘आता कोरोनाची कोणतीही लाट येणार नाही, आता कोरोना हा वातावरणात असणारच आहे, जसे मलेरिया, डेंग्यू आदी आजार होतात, तसा कोरोना हा आपला नियमितचा आजार होणार आहे.’ तरीही त्या संदर्भात जी काही काळजी घ्यायला हवी, ती आता अंगवळणी पडायला हवी. देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, तर तितक्याच लोकांनी केवळ पहिलाच डोस घेतल्याचीही आकडेवारी समोर आली आहे. ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणजे वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर आदींनी वर्धक मात्रा म्हणजे ‘बूस्टर डोस’ही घेतला आहे. बूस्टर डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते; मात्र त्याचा गंभीर परिणाम झाला नाही. ही स्थिती पहाता चौथी लाट आली, तरी घाबरण्यासारखे काही नसेल, असेच म्हणावे लागेल. ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’च्या ‘साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागा’चे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनीही याला दुजोरा दिलेला आहे. उलट त्यांनी चौथ्या लाटेचा धोका अत्यंत अल्प असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. याच प्रयत्नांमध्ये त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. केवळ कोरोनाच नव्हे, तर कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. व्यक्ती, समाज आणि देश हे तिघे आजारी असतील, तर ते कधीही प्रगती करू शकत नाहीत, हे प्रत्येक भारतियाने लक्षात ठेवले पाहिजे !