मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद !
नाशिक – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यासह १४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. त्यांच्यावर राजस्थान सरकार विज्ञापनांच्या माध्यमातून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमीष दाखवत व्यावसायिक आणि तक्रारदार सुशील पाटील (रा. नाशिक) यांची तब्बल ६ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे, असा आरोप आहे. वैभव यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
सुशील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुजरात येथील काँग्रेसचे नेते सचिन वालेरा यांनी आपल्यावर प्रभाव पाडला आहे. वालेरा यांनी ‘अभिक ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनासाठी राजस्थान सरकारसाठी काम करतात. त्यांनी पाटील यांना या आस्थापनाच्या माध्यमातून मोठा परतावा आणि सरकारी कराराचे आश्वासन दिले. त्यामुळे पाटील यांनी एकूण ३.९३ कोटी रुपये विविध १३ अधिकोष खात्यांत ‘स्लीपिंग पार्टनर’ म्हणून गुंतवले. त्यांचा सहभाग व्यवसायाला भांडवल पुरवण्यापुरताच मर्यादित होता; पण वालेरा यांनी परताव्याचे वचन दिल्याप्रमाणे त्यांना १९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यांनी रकमेवरील व्याजासह ६.८ कोटी रुपयांची फसवणूक केली.
वैभव गेहलोत हेही त्यांच्यासमवेत काम करत होते, असे वालेरा यांनी सांगितले होते; मात्र मी पैसे परत मागण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला पैसे देणे बंद केले, तसेच जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा वालेरा यांनी ‘मी तुमचे वैभव यांच्याशी बोलणे करून देतो’, असे सांगितले.
६ मासांपासून वालेरा यांचा शोध लागत नाही. वैभव यांनी या प्रकरणाचा माझा कसलाही संबंध नाही. ज्या प्रकरणात माझे नाव आले आहे, त्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये ज्याप्रकारे चर्चा चालू आहे, मला अशा कोणत्याही गोष्टीची माहिती नाही, असे ट्विटरवर सांगितले आहे.