शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !
भ्रष्टाचाराची बजबजपुरी संपवण्यासाठी नीतीमान समाज हवा ! – संपादक
कराड, २० मार्च (वार्ता.) – तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. रत्नमाला रामदास जाधव (वय ५२ वर्षे) असे या गृहपाल महिलेचे नाव आहे. निवृत्तीवेतन मिळवून देण्यासाठी ही लाच जाधव यांनी घेतली.
उत्तर पार्ले येथे मागासवर्ग आणि इतर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या ठिकाणी रत्नमाला जाधव या गृहपाल आहेत. सासूबाईंच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्ती वेतन सासर्यांना मिळावे, यासाठी तक्रारदार महिला प्रयत्न करत होती. यासाठी गृहपाल यांनी तक्रारदार महिलेकडे २० सहस्र रुपये लाचेची मागणी केली होती. नंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घटनेची सत्यता पडताळून सापळा रचला. त्यानुसार १७ मार्च या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृहपाल जाधव यांना १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.