छत्रपती शिवराय स्वधर्म स्वाभिमानी कि धर्मनिरपेक्ष ?
१. शिवकालीन गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याची नितांत आवश्यकता असणे
महाराष्ट्रात गेल्या काही दशकांपासून शिवजयंतीनिमित्त शिवकालीन इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करण्याचा आणि त्याद्वारे समाजात संभ्रम अन् बुद्धीभेद निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रम चालू आहे. ‘आम्ही सांगू तोच इतिहास आणि आम्ही देऊ तेच पुरावे’, अशा प्रकारची आडमूठी भूमिका घेऊन काही बाजारू विचारवंत तथा स्वयंघोषित विचारवंत मंडळी समाजात धादांत खोट्या इतिहासाचा प्रचार करत आहेत. श्रीमंत कोकाटेंपासून सुभान अली, नौशाद उस्मान यांच्यासारखे शेकडो स्वयंघोषित विचारवंत समाजात शिवजयंती आणि शारदीय व्याख्यानमाला यांमध्ये शिवकालीन खोटा इतिहास मांडण्याचा ‘अजेंडा’ पद्धतशीर राबवत आहेत, तसेच स्वतःला खोटा इतिहास सांगण्याचा परवाना (लायसन्स) मिळाले आहे, अशा पद्धतीने वागत आहेत. ‘छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये प्रचंड मुसलमान सैनिक होते’, हे सांगण्याची यांच्यामध्ये जणूकाही स्पर्धाच लागली आहे. मुसलमान सैनिकांचे प्रमाण कुणी ५० टक्के, तर कुणी ५७ टक्के सांगत आहेत. एवढेच नव्हे, तर ‘स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवरायांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती’, ‘कुराण वाचले होते’, असा इतिहास सांगत आहेत. वास्तवात उपरोक्त गोष्टी तर्कसंगत नसून असा खोटा इतिहास सांगणे म्हणजे सरळसरळ हवेला लाथा मारण्याचा प्रकार म्हणावा लागेल. एकीकडे दादोजी कोंडदेव यांना नाकारून बाबा याकूत यांना शिवरायांचा गुरु ठरवण्याचा प्रयत्नही चालू आहे. त्यामुळे आपल्या शिवकालीन गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे.
२. गडदुर्गांवर अवैध मजार उभारण्याचे षड्यंत्र उघड झाले असून त्याला विरोध करणे सर्वांचे कर्तव्य असणे !
शिवकालीन इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी नौशाद उस्मान यांनी ‘कुराणचा आदर करणारे शिवराय’, या नावाचे पुस्तक लिहून त्यात आश्चर्यजनक दावे केले आहेत. या निराधार पुस्तकाचा प्रचार हिंदूंमधील काही बाटगे करत आहेत. असा खोटा इतिहास सांगण्यामागे त्यांचा उद्देश काय ? किंवा कोणता हेतू आहे ? हे मात्र स्पष्ट नसले, तरी नजीकच्या काळात गडदुर्गांवर अवैध मजार उभारण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे आणि त्यामध्येच खोटा इतिहास सांगण्याचे गुपित दडले, अशी शंका उपस्थित होत आहे. ‘रायगडावर मशीद होती’, असे सांगायचे आणि छुप्या पद्धतीने रायगड परिसरामध्ये मजार उभारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भयंकर षड्यंत्रच आहे. पहिले छोटी मजार, नंतर दर्गा आणि कुणी लक्ष न दिल्यास मशीद उभारून गडदुर्गांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र कार्यरत आहे. रायगडासह कुलाबा किल्ल्यावरही असा अपप्रकार झालेला आहे. यापूर्वी हा अपप्रकार प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला आहे. कुणी लक्ष न दिल्यामुळे तेथे ‘अफझलखान मेमोरियल ट्रस्ट’ने प्रचंड मोठे अवैध बांधकाम केले आहे. एकीकडे तरुणांना शिवकालीन खोटा इतिहास सांगायचा आणि दुसरीकडे छुप्या पद्धतीने गडदुर्गांवर मजार, दर्गा उभारण्याचे षड्यंत्र रचायचे, असे प्रकार चालू आहेत. त्याचा विरोध करणे आवश्यक आहे. खरेतर रायगडावर मशीद सोडा; पण तिचे काही अंश जरी असते, तर धर्मांध तेथे जाणीवपूर्वक नमाजपठण करण्यासाठी पूर्ण ताकदीने एकवटले असते, याचा विचार करणे आणि तथाकथित शिवभक्तांच्या बेगडी निष्ठा तपासणे आता क्रमप्राप्त ठरेल. वेळ प्रसंगी तथाकथित शिवभक्तांचा वैध मार्गाने विरोध करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच खोटा इतिहास सांगणार्याला प्रतिप्रश्न करून बिनबुडाच्या खोट्या इतिहासाचे पुरावे मांडून त्यांना उघडे पाडले पाहिजे.
३. हिंदु समाजावर आघात करणार्याचे मुंडके छाटणारे आणि मंदिरांचे पुनर्निर्माण करणारे शिवराय धर्मनिरपेक्ष कसे ?
धर्मांध लुटारूंनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी उभ्या केल्या होत्या; पण शिवरायांनी कल्याण-भिवंडीपासून गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिरांचे पुनर्निर्माण करत मशिदी जमीनदोस्त केल्या होत्या. नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर यांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतले. त्यामुळे हिंदु समाजावर आघात करणार्याचे मुंडके छाटणारे आणि मंदिरांचे पुनर्निर्माण करणारे शिवराय धर्मनिरपेक्ष कसे ? शिवराय स्वधर्म स्वाभिमानी होते कि धर्मनिरपेक्ष होते ? याचा समाजाने विचार करून महाराष्ट्रात जो काही कांगावा चालू आहे, तो बंद
पाडला पाहिजे !
– श्री. अशोक राणे, अकोला