छत्रपती शिवरायांचे संघटनकौशल्य !
२१ मार्च २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्यानिमित्त…
महाराष्ट्राच्या भाळावर ३५० वर्षांपूर्वी ‘दुर्भाग्य’ हा शब्द कोरून ठेवला होता. एखाद्या मांसाच्या गोळ्यावर अनेक हिंस्र श्वापदे एकसाथ तुटून पडून त्याचे लचके तोडतात, अगदी त्याच पद्धतीने सुमारे ३५० वर्षांपूर्वी ५ पातशाह्यांनी महाराष्ट्राच्या भूमीचे तुकडे केले होते आणि तेच तुकडे येथील मराठी सरदारांनाच वतने म्हणून देण्यात येत होते. सुलतानांच्या या आपापसांतील लढायांमुळे मराठी समाज विखुरला जात होता. हे सरदार वतनांसाठी बादशहांचे तळवे चाटत होते. या वतनांच्या तुकड्यासाठी ते एकमेकांच्या जिवावर उठले होते. आपल्याच पुत्रांच्या रक्ताने न्हाऊन निघालेली भूमाता दु:खी-कष्टी झाली होती; परंतु ती वाट पहात होती, त्या हिंस्र श्वापदांना धडकी भरवणार्या सिंहगर्जनेची ! ती वाट पहात होती, आपल्या सर्व पुत्रांना एकत्रित करून परकीय सत्तांना या मातीतून उखडून फेकणार्या तलवारीच्या पातीची, वेदनांनी विव्हळ झालेली भूमाता वाट पहात होती, त्या वीर पराक्रमी पुत्राची ! अखेर तो दिवस उजाडला आणि तो वीर पुत्र जन्मला. भूमाता आनंदून गेली. फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला ! शिवनेरी किल्ल्यातील श्री शिवाईदेवीच्या कृपेमुळे त्यांना ‘शिवाजी’ अशा नावाने संबोधले गेले.
१. जिजाऊमातेने बालपणीच शिवरायांना राम-कृष्णादी देवतांच्या गोष्टी सांगून घडवणे आणि ईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व बिंबवणे
जन्मत:च तेजस्वी असलेल्या पुत्राचे तेज जिजाऊंच्या संस्काराने अधिकच वाढत होते. ‘मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे’, या शहाजीराजे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊमाता शिवबांना घडवत होत्या. वानर सेनेला संघटित करून रावणासारख्या मोठ्या असुराचा वध करणार्या प्रभु श्रीरामाचे अवतारी कार्य सांगून शिवबांना घडवत होत्या. कपट कारस्थानांना ठेचून काढून नीतीने राज्यकारभार कसा चालवावा ? यासाठी त्या शिवबांना कृष्णनीती शिकवत होत्या. लंका जाळणार्या हनुमंताप्रमाणे या परकीय सत्तांची राख करण्यासाठी शिवरायांच्या मनात वणवा पेटवत होत्या. समोर शत्रूही मोठे होते आणि ते १-२ नव्हे, तर अनेक होते. असे असले, तरी भगवंताचे अधिष्ठान असलेल्या पांडवांचाच विजय होतो, हेही त्या शिवबांच्या मनावर बिंबवत होत्या.
२. छत्रपती शिवरायांनी बालपणीच मित्रांसमवेत स्वराज्य स्थापनेची शपथ घेणे आणि बालमावळ्यांनीही त्यासाठी सर्वस्व देण्याची सिद्धता दर्शवणे
बालपणी शिवराय मावळ प्रांतातील मित्रांना संघटित करून त्यांच्यासमवेत कुस्ती, तलवारबाजी, घोडेस्वारी यांचा सराव करत खेळत. शिवराय त्यांच्यामध्ये असे मिसळत जणू ते त्यांच्यातीलच आहेत. शिवराय त्यांना उपदेशही करत. ‘‘मावळ्यांनो, अजून किती दिवस या बादशहांच्या तुकड्यावर जगायचे ? आता वेळ आली आहे आत्मसन्मानाने जगण्याची. पातशाह्यांना मातीतून उखडून फेकण्याची. यासाठी आपण सर्वजण मिळून स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊया, ‘हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा !’’ छत्रपती शिवरायांची ही वाणी ऐकताच सर्व मावळे एकदम चमकून जात असत. ते शिवरायांना म्हणत, ‘‘महाराज, जिथे तुम्ही बोट दाखवाल, तिथे आम्ही जीव ओतू.’’ हे मावळे वतनांसाठी नव्हे, तर स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्यास सिद्ध झाले होते. या मावळ्यांमुळेच छत्रपती शिवरायांना प्रत्येक लढाईत विजय मिळत गेला. शिवरायांनीही मूठभर मावळ्यांना घेऊन शत्रूचा नि:पात केला. हे मावळे म्हणजे जिवाला जीव देणारी रत्नेच होती; परंतु या रत्नांना एकत्र गुंफणारी सोन्याची तार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते.
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटनाच्या बळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
निर्भिडता, नेतृत्व, उत्तम नियोजनकौशल्य आणि प्रजेवरील वात्सल्य यांमुळे प्रत्येक मावळा हा स्वराज्यासाठी रक्ताने जोडला जात होता. याच संघटनाच्या बळावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवप्रेमींनो, ‘सङ्घे शक्तिः कलौयुगे’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) या तत्त्वाचा उपयोग करून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपणही संघटित होऊन ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी (हिंदु राष्ट्रासाठी) तन, मन, धन यांचा त्याग करूया. जय भवानी, जय शिवराय !
– श्री. चैतन्य दीक्षित (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२०.१.२०२२)