बिहारमध्ये पोलिसांच्या मारहाणीत एक तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त गावकर्‍यांनी पोलीस ठाणे पेटवले !

एका पोलिसाचा मृत्यू

  • पोलिसांच्या कोठडीत आरोपींचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेक वेळा घडतात; मात्र जनतेने संतप्त होऊन पोलीस ठाणे पेटवल्याचे दुर्मिळ उदाहरण होय ! या उद्रेकास कारणीभूत कोण ? पोलिसांनी स्वतःमध्ये पालट केला नाही, तर अशा घटना सतत घडतील, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! – संपादक
  • ‘बिहारचे पोलीस राज्यात पुन्हा जंगलराज आणत आहेत का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो ! – संपादक
घटनास्थळ

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार राज्यातील पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील बलथर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी डिजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावल्यावरून अनिरुद्ध यादव या तरुणाला पकडून नेले होते. या तरुणाला पोलीस ठाण्यात नेऊन प्रचंड मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक गावकर्‍यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून तोडफोड केली आणि त्याला आग लावली. पोलिसांच्या ३ गाड्याही जाळण्यात आल्या. तसेच पळून जाणार्‍या पोलिसांचा पाठलाग करून त्यांना पकडून चोपले. यात हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला. ही घटना १९ मार्चच्या दिवशी घडली. गावकर्‍यांनी मृत तरुणाचा मृतदेह येथील बलधर चौकात ठेवून आंदोलनही केले.

येथील पोलीस अधीक्षक उपेंद्रनाथ वर्मा यांनी दावा केला की, पोलिसांनी पकडून आणलेल्या अनियुद्ध यादव याचा मृत्यू मधमाशांनी चावा घेतल्याने झाला.