रशिया-युक्रेन युद्ध : माहिती युद्धाचा प्रत्यक्ष युद्धावरील परिणाम !

या प्रतिमा युद्धाची भीती दर्शवितात !

१. माहिती युद्धाच्या माध्यमातून रशियाने संगणकाच्या साहाय्याने सिद्ध केलेल्या खोट्या कारवाया दाखवणे

रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध हा एक वेगळा पैलू आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या वादात प्रत्यक्ष भूमीवर युद्ध चालू असतांना मानसिक युद्धही मोठ्या प्रमाणात चालू आहे. रशियाला माहिती युद्ध किंवा मानसिक युद्ध करण्याची प्रचंड क्षमता असलेले राष्ट्र समजले जाते. रशियाने याचा वापर सीरिया, इराण आणि आर्मेनिया या देशांमध्येही केलेला होता. अमेरिका, युरोप आणि ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) हेही माहिती युद्धामध्ये प्रविण आहेत. रशियाच्या माहिती युद्धामध्ये ‘डिप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याचा अर्थ संगणकाच्या साहाय्याने सिद्ध केलेल्या खोट्या कारवाया, ज्या प्रत्यक्षात झालेल्या नसतांना सदोदित दाखवत रहायचे. युक्रेनच्या जनतेला घाबरवण्यासाठी ‘रशिया आपल्यावर आक्रमण करणार आहे’, असा आभास निर्माण करायचा. ज्यामुळे ते त्यांच्या सरकारच्या विरोधात जातील; परंतु तसे झाले नाही. याउलट युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे युक्रेनचे नायक बनले.

‘डिप फेक’ तंत्रज्ञान (प्रतिकात्मक चित्र)
(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. रशियाने माहिती युद्धाचा अचूक आणि चतुराईने वापर करून युक्रेनसह जगाची दिशाभूल करणे

‘डिप फेक’ तंत्रज्ञानामध्ये ‘इंटरनेट’च्या माध्यमातून वेगवेगळी खोटी चित्रे, ग्राफिक्स, वेगळ्या विषयावर लेख आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात. युद्धाची माहिती मिळवण्यासाठी माध्यमे शोध घेत असतात. त्यांना प्रचंड प्रमाणात अशी माहिती मिळते. रशियाने ‘सायबर’ जगतामध्ये सीमेवर सैन्याच्या जमवाजमवीचे शेकडो चलचित्र प्रसारित केली. ‘टिक टॉक’ किंवा इतर सामाजिक माध्यमांवर रशियाकडून आक्रमक कारवाई केली जात असल्याचे दाखवले गेले. याखेरीज ‘आंतरराष्ट्रीय मते जिंकण्यासाठी रशिया सैन्याला मागे घेऊन जाणार आहे’, ‘संयुक्त राष्ट्रांमध्ये रशिया आता दायित्वाने वागेल’, असे लेख नियोजित केले गेले; पण त्वरित ही पद्धत पालटली आणि ‘बेलारुसमधील केवळ स्वातंत्र्यलढ्याला रशियाने साहाय्य केले’, असे दाखवले. जी दोन राज्ये युक्रेनपासून वेगळी झाली, तीही स्वत:हून वेगळे होण्याची मागणी करत होती, असे दाखवले. यामागे रशियाचे सैन्य या लढाईला लढाई म्हणत नाही, तर त्याला केवळ एक ‘विशेष मोहीम’ म्हणते, हा उद्देश होता.

केवळ युक्रेनमध्ये असलेल्या नाखूश लोकांना साहाय्य करण्यासाठी रशियाचे सैन्य हे तिथे पोचलेले आहे. नंतर ‘रशियाचे नौदल समुद्रातून निकोराय भागावर आक्रमण करणार आहे’, असेही दाखवले. वास्तविक खरे आक्रमण खारकीव आणि खरसॉन या शहरांवर करण्यात आले. याचाच अर्थ माध्यमांचा अचूकपणाने आणि चतुराईने वापर करून युक्रेनसह जगाची दिशाभूल केली.

३. रशियाच्या माहिती युद्धाला युक्रेनने ‘जशास तसे’ उत्तर देणे आणि या युद्धात युक्रेनची सरशी होणे

युक्रेनवर सायबर आक्रमण झाल्यानंतर तेथील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडली. त्या वेळी ॲलन मस्क यांनी उपग्रहाच्या साहाय्याने युक्रेनला इंटरनेट दिले. त्यामुळे युक्रेन मानसिक युद्धात रशियाशी जोरदार लढा देत आहे. युक्रेनने दाखवले की, नेक आयलंडवर त्यांच्या १२ सैनिकांनी रशियाच्या सैन्याशी लढा दिला; पण हे खरे होते का ? युक्रेनचे शूर सैनिक आणि सामान्य नागरिक लढाईसाठी सिद्ध आहेत, हे दाखवण्यासाठीची ती रणनीती होती. त्यात यश आले असेलही; परंतु दुसरीकडे २० लाखांहून अधिक नागरिकांनी युक्रेन सोडले. अशाच प्रकारे युक्रेनच्या राष्ट्रपतींना विविध ठिकाणी दाखवण्यात आले. यामुळे युक्रेनचे राष्ट्रपती स्वत: युद्धात भाग घेत असल्याचे दिसले. त्यातून ते देशाचे नायक बनले. पाश्चात्त्य माध्यमांमध्ये रशियाच्या आक्रमणाला ‘एक सैतानी’ आक्रमण दाखवले गेले. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या रुग्णालयावर आक्रमण केले. त्यात महिला आणि लहान मुले मारली गेली, असेही दाखवले गेले.

युक्रेननेही रशिया त्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठा बाँब वापरत आहे, असा आभास निर्माण केला; परंतु ते नक्कीच खरे नसावे. रशियाने युक्रेनच्या अणूभट्टीवर आक्रमण केल्याने तिथे अणूबाँबचा स्फोट होऊ शकतो, असे दाखवले. त्यामुळे काळजी वाढली. युक्रेनने पकडलेल्या रशियाच्या सैनिकांच्या मुलाखती दूरचित्रवाहिनीवर प्रसारित केल्या. त्यात त्यांनी ‘आम्हाला या लढाईमध्ये यायचे नव्हते. आम्ही केवळ ३ वर्षांसाठी सैन्यामध्ये आलो आहोत’, अशा प्रकारची मत व्यक्त केले. याखेरीज रशियाचे नष्ट केलेले रणगाडे, मोठी वाहने यांचीही छायाचित्रे दाखवली. हे खरे असेल का ? याविषयी साशंकता आहे.
रशियाने केलेल्या माहिती युद्धाचा युक्रेनवर फारसा परिणाम झाला नाही. युक्रेनचे नेतृत्व, त्यांचे सैन्य आणि बहुतांश नागरिक युद्ध लढत आहेत; मात्र ‘आम्ही केवळ लष्करी तळावर आक्रमण करत आहोत किंवा जेथून शस्त्रांचा मारा होत आहे, त्यांना प्रत्युत्तर देत आहोत आणि आम्ही नागरिकांच्या घरांवर आक्रमणे करत नाही’, असे रशिया सांगण्याचा प्रयत्न करत होता.

४. पाश्चात्त्य जग आणि युक्रेन यांनी रशियाच्या विरोधात माहिती युद्ध चालवल्याने जागतिक मत रशियाच्या विरोधात जाणे

रशियाविरुद्ध चाललेले माहिती युद्ध पाश्चात्त्य जग आणि युक्रेन चालवत आहे. यात त्यांना अधिक यश मिळत आहे. जगामध्ये बहुतेक देश माहिती युद्धात रशियाच्या विरोधात गेले आहेत. संयुक्त राष्ट्रामध्ये झालेल्या मतदानामध्ये १४३ देशांनी रशिया आक्रमणकारी आहे; म्हणून त्याच्या विरोधात मतदान केले. तेव्हा केवळ तीनच देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले आणि ३५ देश या मतदानामध्ये तटस्थ राहिले. याचाच अर्थ जगाचे मत हे मोठ्या प्रमाणात रशियाच्या विरोधात आहे; पण म्हणून रशिया युद्ध थांबवेल का ? याचे उत्तर आहे, ‘नाही !’ रशियाला ठाऊक आहे की, ‘नाटो’ किंवा युरोप हे केवळ माहिती युद्ध करू शकतात. प्रत्यक्ष लढाई करण्याची त्यांची क्षमता नाही. २४ दिवसांच्या लढाईनंतर असे म्हणता येईल की, युक्रेन आणि रशिया एकमेकांच्या विरोधात माहिती युद्ध प्रचंड प्रमाणात करत आहेत आणि जगातील माध्यमे त्याला बळी पडत आहेत. यामध्ये नेमके खरे काय आणि खोटे काय, हे कळणे कठीण आहे. सध्या तरी या माहिती युद्धात युक्रेन पुढे आहे; परंतु यामुळे रशियाचे आक्रमण थांबेल आणि रशिया परत जाईल, अशी शक्यता नाही.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.

(साभार : दैनिक ‘पुढारी’)