आयकर विभागाकडून परिवहनमंत्री अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींवर धाडी !
मुंबई – आयकर विभागाकडून परिवहनमंत्री अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी येथे एकूण २६ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. अनिल परब यांच्या दापोली येथील भूमीवर धाडी टाकल्या आहेत. येथील रिसॉर्टच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यय झाल्याचे आढळले. या संदर्भात सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे आणि त्यांच्या नातेवाइकांनी राज्यात अनेक ठिकाणी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे.
आयकर विभागाच्या शोधमोहिमेत ६६ लाख रुपयांची रक्कम, काही डिजिटल पुरावे आणि कागदपत्रेही आयकर विभागाच्या हाती लागली आहेत. आयकर विभागाकडून ही कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवण्यात येणार आहेत. त्यानंतर संचालनालयाकडून या प्रकरणात गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.